‘कोस्टल’ जवळील घरे १५ टक्क्यांनी महागणार! पश्चिम उपनगरांत घर घेण्यास नागरिकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:11 AM2024-03-13T10:11:37+5:302024-03-13T10:13:15+5:30
‘कोस्टल’ रोड जवळील घरांच्या किमतीमध्ये देखील किमान १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मुंबई : नुकत्याच सुरू झालेल्या कोस्टल रोडमुळे एकीकडे मुंबईच्या वाहतुकीचा वेग वाढणार असतानाच दुसरीकडे वेळेची बचत करणाऱ्या या प्रकल्पामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांत आणखी तेजी येणार असल्याचा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या घरांच्या किमतीमध्ये देखील किमान १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
आजच्या घडीला पश्चिम उपनगरात वांद्रे ते विले पार्ले परिसरात शंभरपेक्षा जास्त गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरू आहे. येथून आता नरिमन पॉइंटपर्यंत जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक जणांच्या वेळेत बचत होईल.
परिणामी, घर खरेदीस इच्छुक लोक मुंबईतील अन्य भागांपेक्षा पश्चिम उपनगरांना पसंती देतील, असे मानले जात आहे.
उपनगरांत घर घेण्यास पसंती -
१) हा रस्ता दक्षिण मुंबईत जिथे उतरतो तेथील घरांच्या किमती या कायमच गगनाला भिडलेल्या आहेत. त्यातुलनेत पश्चिम उपनगरातल्या किमती कमी आहेत.
२) २०२३च्या वर्षामध्ये मुंबई शहर व उपनगरात दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. त्यापैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त घरांची विक्री ही पश्चिम उपनगरांत झालेली आहे.
३) पश्चिम उपनगरांत गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांत मोठी वाढ झाली आहे तसेच आगामी काळात देखील जे प्रकल्प सुरू आहेत, ती पूर्णत्वाच्या दिशेने आहेत.