सचिन तेंडुलकरच्या सास-यांच्या घराला आग, अनेक नामवंतांची इमारतीत घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:25 AM2017-10-25T05:25:10+5:302017-10-25T05:25:14+5:30
मुंबई : वांद्रे पश्चिमेकडील ‘ला मेर’ या सतरा मजली इमारतीच्या १३व्या मजल्यावर मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
मुंबई : वांद्रे पश्चिमेकडील ‘ला मेर’ या सतरा मजली इमारतीच्या १३व्या मजल्यावर मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. तेराव्या मजल्यावरील ज्या घराला आग लागली, ते घर सचिन तेंडुलकर याच्या सास-यांचे असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. आगीची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेतीन तासांत आग विझविली. ३ वाजून १७ मिनिटांनी आग पूर्णपणे विझविण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय राहात होते.
अग्निशमन दलाच्या हेल्पलाइन क्रमांकावर वांद्रे पश्चिमेकडील माउंट मेरी चर्चजवळील कादेश्वरी मार्गावरील ‘ला मेर’ या १७ मजली हाय प्रोफाइल इमारतीच्या १३व्या मजल्यावर आग लागली असल्याची माहिती मंगळवारी दुपारी १२.२१ प्राप्त झाली. १२.४४ वाजता अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी अथक प्रयत्नानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. साडेतीन तासांनंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली. आग विझविण्यासाठी एक फायर इंजिन, एक जंबो टँकर, एक पाण्याचा टँकर आणि एक मोठी शिडी असे साहित्य आणि कर्मचाºयांचा ताफा; याची मदत घेण्यात आली. आगीत विजेच्या तारा, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, आणि साहित्य जळून खाक झाले.
विजेसह पाण्याची जोडणी कापली
दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या प्रकरणी सोसायटीला नोटीस पाठविण्यात येईल. येथील वीज आणि पाण्याची जोडणी संबंधित विभागाकडून कापण्यात आली आहे.
जोपर्यंत इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार नाहीत, तोवर जोडणी पूर्ववत करण्यात येणार नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
>येथे सचिनसह ऐश्वर्याचेही कुटुंब राहात होते
वांद्रे येथील दुर्घटनाग्रस्त हाय प्रोफाइल इमारतीमध्ये यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय राहात होते. ऐश्वर्याची आई आणि भाऊ या इमारतीमध्ये वास्तव्य करतात. आगीच्या घटनेनंतर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने घटनास्थळी धाव घेतली.