तळई गावातील ६३ कुटुंबांसाठी घरांची उभारणी दिवाळीपर्यंत केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:22 AM2021-08-25T06:22:35+5:302021-08-25T06:23:10+5:30

जितेंद्र आव्हाड; पुनर्वसन प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबवणार. तळीये गावाची नव्याने उभारणी करताना तेथील दरडप्रवण क्षेत्राचा धोका लक्षात घेतला जाणार आहे.

Houses will be constructed for 63 families in Talai village till Diwali | तळई गावातील ६३ कुटुंबांसाठी घरांची उभारणी दिवाळीपर्यंत केली जाणार

तळई गावातील ६३ कुटुंबांसाठी घरांची उभारणी दिवाळीपर्यंत केली जाणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निसर्गाच्या अवकृपेनंतर तळई गावातील व आजूबाजूच्या पाड्यातील अशा एकूण २६१ घरांची उभारणी करून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर सोपविली असून, हा पुनर्वसन प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तळई गावातील ६३ कुटुंबांसाठी घरांची उभारणी येत्या दिवाळीपर्यंत केली जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत रायगड जिल्ह्यातील तळई गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे उद्ध्वस्त होऊन मोठी जीवित व वित्त हानी झाली. त्यामुळे येथील एकूण २६१ घरांची उभारणी करून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाने म्हाडावर सोपविली आहे. त्या दृष्टीने म्हाडातर्फे नियोजन करण्यात येत असून पुनर्वसन घरांची प्रतिकृती म्हाडामार्फत वांद्रे येथील मुख्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आली आहे. तळई गावातील दरडग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या सदनिकांच्या प्रतिकृतीची पाहणी जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी केली, तेव्हा ते बोलत होते. ते म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात आजूबाजूच्या पाड्यातील कुटुंबीयांसाठी घरांची उभारणी केली जाणार आहे. या घरांची उभारणी मार्च २०२२ पर्यंत करण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे.

‘प्री फॅब’ तंत्रज्ञानाचा वापर
रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून व गावातील नागरिकांच्या गरजांचा विचार करून लेआऊट तयार केला जाणार आहे. या लेआऊटमध्ये जनावरे बांधायची जागा, शेतीचे सामान ठेवण्यासाठी जागा आदी बाबींचा विचार केला जाणार आहे. प्री फॅब तंत्रज्ञानाने या घरांची उभारणी केली जाणार असून गावकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी विचार विनिमय करून घराच्या आराखड्याला अंतिम रूप दिले जाणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी दिली.

तळीये गावाची नव्याने उभारणी करताना तेथील दरडप्रवण क्षेत्राचा धोका लक्षात घेतला जाणार आहे. त्याचा विचार करूनच बांधणी केली जाणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Houses will be constructed for 63 families in Talai village till Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.