बेदरकार दुचाकीस्वारांना आवरा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 02:35 AM2019-05-04T02:35:57+5:302019-05-04T02:36:21+5:30
७० वर्षीय आजोबांचे पोलीस आयुक्तांना पत्र : मुंबईतील वाहतुकीच्या समस्यांचा वाचला पाढा
मुंबई : ‘आम्ही पाहिलेली मुंबई आता वाहतूककोंडीत घुसमटताना दिसते आहे. त्यातून वाट काढत पुढे जातो, त्यात भरधाव दुचाकीस्वारांची भर. त्यामुळे त्यांना आवरा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू,’ असा इशारा माहिमच्या ७० वर्षीय आजोबांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.
माहिमचे रहिवासी असलेले डॉक्टर शरद गोगटे (७०) यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हे पत्र लिहिले आहे. ते पत्रात म्हणतात, दिवसेंदिवस ढासळलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे मुंबईचे चित्र बदलत आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. सिग्नल, एक दिशा मार्ग, प्रवेश निषिद्ध अशा कुठल्याच नियमांचे पालन केले जात नाही. पदपथांची दुरवस्था झाली आहे, शिवाय फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथ वापरता येत नाहीत. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
बेदरकारपणे सुटलेल्या दुचाकीस्वारांमुळे घराबाहेर पडावे की नाही, अशी भीती वाटते. त्यांना काही बोलले की, ते अरेरावीची भाषा करून शिवीगाळ करतात. याबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यास ते हात वर करतात. त्यामुळे त्यांची मुजोरी वाढत चालली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दुचाक्यांच्या नंबर प्लेट नीट न दिसल्याने ई-चलान पाठविता येत नाही, असेही उत्तर वाहतूक पोलिसांकडून मिळते. त्यामुळे तुम्ही स्वत: याकडे लक्ष द्या, असे आवाहन पत्रातून केले आहे. पोलिसांच्या मदतीला हवे असल्यास आम्ही वाहतुकीच्या नियोजनासाठी उभे राहतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
आयुक्तांकडून उत्तर नाही
गोगटे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रावर अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने वाहतूक समस्येबाबत त्यांनी पाढा वाचला आहे. या पत्रावर निवृत्त डॉक्टर, वकील, बँक अधिकाºयांनी सहमतीच्या सह्या केल्या आहेत.