मुंबई : गृहिणीचे काम अमूल्य आहे. मात्र, नोकरी करणा-या महिलांना जेवढा सन्मान मिळतो, तेवढा गृहिणीला मिळत नाही, अशी खंत व्यक्त करत मोटार वाहन लवादाने एका अपघाताच्या केसमध्ये गृहिणीची कुटुंबातील भूमिका अधोरेखित करत, एका विमा कंपनीला व गृहिणीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्याला संबंधित महिलेच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.११ सप्टेंबर २०१५ रोजी मोटारसायकलने फातिमाला धडक दिली. त्यात तिचा मृत्यू झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याने फातिमाच्या पतीने चालकाकडून ६ लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली. मात्र, विमा कंपनीने फातिमा गृहिणी असल्याने त्यांचे वार्षिक उत्पन्न ठरवू शकत नाही, अशी बाजू लवादापुढे मांडली.लवादाने विमा कंपनीचा हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला देत ग्राह्य धरण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने गृहिणीचे मासिक उत्पन्न पाच हजार रुपये धरण्याचा आदेश एका निकालात दिला आहे. ‘एक आई, पत्नी, बहीण यांच्या सेवेचे मूल्य पैशात केले जाऊ शकत नाही. कारण ती सर्व सेवा प्रेमाने व जिव्हाळ्याने करत असते. अशा महिलेचा मृत्यू झाला, तर कुटुंबात न भरून येणारी पोकळी निर्माण होते,’ असे निरीक्षण लवादाने नोंदविले.५.५ लाखांचीभरपाई मिळणार‘आई, पत्नी व बहिणीच्या सेवेची तुलना आपण कामवाली बाईच्या सेवेशी करू शकत नाही. मात्र, मला एका आईच्या सेवेचे मूल्य तिचे वार्षिक उत्पन्न ठरवून करावे लागत आहे, हे कटू सत्य आहे,’ असे म्हणत मोटार वाहन लवादाने विमा कंपनी व चालकाला फातिमाच्या पतीला व मुलांना ५.५ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.
किमान कामवाल्या बाईपेक्षा गृहिणीला जास्त रक्कम मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 3:23 AM