लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन हजार रुपयांच्या रिफंडसाठी चेंबूर येथील गृहिणीवर सव्वा लाख रुपये गमावण्याची वेळ आली. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात शनिवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
चेंबूर परिसरात ४१ वर्षीय तक्रारदार गृहिणी आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. त्यांच्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी मुलीसोबत दिवाळीच्या खरेदीसाठी गेले असताना एका दुकानात २ हजार रुपयांचे गुगल पे केले. खात्यातून रक्कम वजा झाली असतानाही दुकानदाराला ती न मिळाल्याने अर्धेच सामान घेऊन तेथून जावे लागले.
आठवडा उलटून गेला तरीही पैसे रिफंड न झाल्याने त्यांनी गुगलवरून बँकेचा ग्राहक सेवा नंबर मिळवला. तेथे संपर्क साधून त्यांनी गुगल पे द्वारे पैसे रिफंड करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा फोन घेणाऱ्या संबंधिताने एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. ॲप डाऊनलोड करतात ओटीपी येऊ लागले त्यांनी ते ओटीपीही त्यांना शेअर केले. मात्र ओटीपी शेअर करताच त्यांच्या खात्यातून १ लाख ३४ हजार वजा झाले. त्यांनी याबाबत फोनवर बोलणाऱ्याकडे विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन बंद केला. त्यांनी बँकेत विचारणा करता तो ग्राहक सेवा क्रमांक नसल्याचे समजले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.