मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपा आणि एमआयएम या प्रमुख राजकीय पक्षांनी जोर लावला असतानाच, ठिकठिकाणी उद्घाटन केलेल्या पक्षीय कार्यालयांचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी गृहिणी महिलांना प्राधान्य असल्याचे चित्र तूर्तास तरी पाहण्यास मिळत आहे.दक्षिण मुंबईचा विचार करता, गिरगाव, भायखळ्यासह गृहिणी महिला कार्यकर्त्यांना जोडण्यावर भर दिला जात आहे. मध्य मुंबईमध्ये लालबाग आणि वरळी येथील दिग्गज उमेदवारांमध्ये महिलांचा समावेश आहे. त्यामुळे, महिला कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. पूर्व उपनगरात कालिना, कुर्ला, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड या पट्ट्यातील पक्षीय कार्यालयात सकाळी-सायंकाळी गृहिणी महिलांची गर्दी अधिक असून, गृहिणी महिला कार्यकर्त्यांना अधिक पसंती आहे.विशेषत: कुर्ला, साकीनाक्याच्या पट्ट्यात काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या पक्षीय कार्यालयात दुपारच्या सत्रात गृहिणी महिलांची संख्या अधिक असून, सद्यस्थितीमध्ये ही संख्या केवळ हजेरीपुरती मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम उपनगरात दहिसर, मालाड, मालवणी, जोगेश्वरी आणि बोरीवली येथील काँग्रेससह शिवसेनेच्या पक्षीय कार्यालयातही हजेरी लावणाऱ्या महिला कार्यकर्त्यांच्या संख्येत भर पडत आहे. परिणामी, सध्या तरी पक्षीय कार्यालयांची ‘मदार’ गृहिणी महिलांवर असल्याचे चित्र असून, आता प्रचार आणि प्रसारातही गृहिणी महिला आघाडीवर असणार आहेत. (प्रतिनिधी)
गृहिणी महिला कार्यकर्त्यांवर मदार
By admin | Published: February 08, 2017 4:39 AM