मुंबई : माझगावमधील गृहिणीला पार्ट टाईम जॉबच्या नादात खाते रिकामे होण्याची वेळ ओढवली. सायबर ठगांच्या टास्क फसवणुकीत महिलेला आठ लाख १७ हजार रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत, भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.
माझगावमधील बॅ. नाथ पै मार्ग परिसरात फरहीन या कुटुंबासोबत राहतात. पतीचे काम बंद पडल्याने त्या ऑनलाईन पार्ट टाईम नोकरीच्या शोधात होत्या. ६ जानेवारीच्या दुपारी त्यांना इन्स्टाग्रामवर एक पार्ट टाईम जाॅबची जाहिरात दिसली. उत्सुकतेपोटी फरहीन यांनी या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर जेफरी स्मिथ नावाचा व्हाॅट्सअॅप चॅट ओपन झाले. फरहीन यांना त्यांचा बायोडाटा विचारण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडून बॅंक खात्याची माहिती घेऊन एक लिंक पाठविण्यात आली. फरहीन यांनी लिंकवर क्लिक करताच, आकांक्षा नावाच्या टेलिग्राम युजरशी जोडल्या गेल्या.
टेलिग्राम खात्यावर आलेले काही व्हिडिओ त्यांना स्क्रिनशॉट काढून पाठविण्यास सांगण्यात आले. फरहीन यांनी तसे करताच त्यांच्या खात्यात एकूण २७७ रुपये जमा झाले. त्यामुळे फरहीन यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांना आनंद इन्स्टा आणि फाॅर्मल एम्प्लाॅई नावाच्या टेलिग्राम ग्रुपवर जाॅईन करुन घेत वेगवेगळ्या पेड टास्क देण्यास सुरुवात झाली. ६ जानेवारी ते २३ जानेवारी या काळात फरहीन यांना वेगवेगळ्या टास्क देऊन त्यांच्याकडून एकूण आठ लाख १७ हजार रुपये उकळण्यात आले. नफा खात्यात दिसत होता. मात्र ते पैसे काढता येत नव्हते. पैशांची मागणी सुरुच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याची फरहीन यांची खात्री पटली. अखेर त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबियांच्या कानावर घालत भायखळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.