मुंबई - अल्पवयीन मुलांची खरेदी-विक्री प्रकरणाची पाळेमुळे खेड्यापाड्यांतील गृहिणींपर्यंत पोहोचली आहेत. गुन्हे शाखेने मुंबईसह रत्नागिरीतून आणखी तीन महिलांना अटक केली आहे. या कारवाईत २९ दिवसांच्या मुलाचीही सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिघीही गृहिणी असून ३५ ते ५० हजार रुपयांचे कमिशन त्यांना यातून मिळाल्याचे तपासात समोर आले.
गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली असून अटक आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे. या कारवाईत एकूण चार चिमुकल्यांची सुटका करण्यास पथकाला यश आले आहे. सनोबर अदनान चिपळूणकर (२९, दापोली), तब्बसुम सैन (४२, खेड) आणि ग्रँट रोड येथून सफिया आली (४२) हिला अटक केली आहे. चिपळूणकर व सैन यांना प्रत्येकी ५० हजार तर सफियाला ३५ हजार रुपये कमिशन मिळाले होते. तिघींना ३० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मानसिक रुग्ण महिलेला विक्रीयाच कारवाईदरम्यान अश्फाक शेख ऊर्फ साहिल नावाच्या आरोपीने भिवंडीतील रोहिणी शिर्के (६३) नावाच्या महिलेला विकलेल्या १ वर्ष दोन महिन्यांच्या मुलीलाही गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. रोहिणी स्वतः मानसिक रुग्ण असून गेल्या १० वर्षांपासून ती मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत आहे. तिच्या मानसिक स्थितीबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.