घरबसल्या मिळणार दाखले
By admin | Published: February 1, 2015 10:59 PM2015-02-01T22:59:27+5:302015-02-01T22:59:27+5:30
सात बारा, लीज अॅग्रीमेंट या दाखल्यांबरोबरच खरेदी-विक्री व्यवहारही आता आॅनलाइन पध्दतीने होणार असल्याने घरबसल्याच विविध दाखले मिळणार
आविष्कार देसाई , अलिबाग
सात बारा, लीज अॅग्रीमेंट या दाखल्यांबरोबरच खरेदी-विक्री व्यवहारही आता आॅनलाइन पध्दतीने होणार असल्याने घरबसल्याच विविध दाखले मिळणार आहेत. रायगड जिल्ह्यातील १५ पैकी आठ तालुक्यांतील सर्व डाटा हा राज्य सरकारच्या सर्व्हरवर फिडिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या सात तालुक्यातील डाटा फिडिंगचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या आॅनलाइन सेवेचा शुभारंभ १ एप्रिलपासून होणार आहे.
ई-गर्व्हनन्स पध्दतीवर भर देऊन राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरणाअंर्तगत हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविला जात आहे. दोन वर्षांपासून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरवात झाली असली तरी, २०१५ मध्ये त्याला विशेष गती मिळाली. रायगड जिल्ह्यातील १५ पैकी मुरुड, तळा, रोहे, माणगाव, म्हसळा, पाली-सुधागड, महाड आणि पोलादपूर या आठ तालुक्यांतील सर्व डाटा हा राज्य सरकारच्या सर्व्हरवर फिडिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या सात तालुक्यांतील डाटा फिडिंगचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी लोकमतशी बोलताना दिली. आठ तालुक्यांची ट्रायल सुरु झाली असून ती सुमारे आठ दिवस चालेल, असेही बागल यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात ८२१ ग्रामपंचायती असून सुमारे एक हजार ९७० महसुली गावे आहेत. सुमारे १३ लाखांच्या आसपास खातेदार आहेत. सर्व डाटा फिडिंग करण्यासाठी महसूल कर्मचारी रात्र-दिवस कामात गुंतलेले आहेत.
राज्याच्या तुलनेत कर्नाटक राज्य पुढे असून जिल्ह्याच्या तुलनेत बुलढाणा आणि लातूर हे दोन जिल्हे आघाडीवर आहेत. कारण यांची निवड ट्रायलसाठी घेण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि तळा तालुक्याची निवड ट्रायलसाठी केली होती. डाटा फिडिंगचे काम आधीच पूर्ण झाल्याचे बागल यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या ई-गर्व्हनन्समुळे जनतेला घरबसल्याच आवश्यक असणारा सातबारा उतारा, आठ अ उतारा, यासह अन्य दाखले आॅनलाइन मिळणार आहेत. त्यामुळे पैशाची आणि वेळेचीही बचत होणार आहे. सॅटेलाइटद्वारे लवकरच सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.