मुंबई, दि. 31 -मुंबईतील जे जे मार्ग परिसरात हुसेनी इमारत दुर्घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले की, यापुढे कोणतीही दया न दाखवता धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना जबरदस्तीने इमारतीबाहेर काढून त्या रिकाम्या करण्यास भाग पाडू. तसंच मुख्यमंत्र्यांचे आदेश घेऊन येत्या 8 दिवसांत ही कठोर कारवाई करणार असल्याचेही मेहता यावेळी म्हणाले होते. यावर, गृहनिर्माण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी प्रकाश मेहता यांना टार्गेट केले आहे.
नेमके काय म्हणाले सचिन अहिर?राज्य सरकारवर टीका करताना सचिन अहिर म्हणाले की, 'किमान या दुर्घटनेनंतर तरी सरकारने श्वेतपत्रिका काढायला हवी. येथील रहिवाशांना २००९ व २०११ मध्ये बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. त्यामुळे २०१६ साली नोटीस दिलेल्या सरकारला दोष देणार नाही. मात्र दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर तरी सरकारने हरकतमध्ये येण्याची गरज होती. धोकादायक इमारतींसाठी सरकारने एक सॉफ्टवेयर करायला हवे होते. त्यासाठी आयआयटी, महापालिका, म्हाडा अधिकारी यांची संयुक्त टीम करून सर्वेक्षण करायला हवे. पुनर्विकासामध्ये खासगी विकासक अपयशी ठरल्यानंतर म्हाडाने ताबा घेण्याची तरतूद करावी. ध्वनी प्रदूषणसाठी तत्परता दाखवणाऱ्यांनी याविषयी तत्परता दाखवावी. सर्व कामे फक्त अधिकाऱ्यांवर सोपवून चालणार नाही. या बाबी गंभीरतेने घेऊन एक रोडमॅप व अॅक्शन प्लॅन तयार करावा. सरकारबाबत लोकांमध्ये विश्वास नाही. आघाडी सरकारने संक्रमण शिबिरे तयार केली, त्यांचे काय केले? हा प्रश्न आहे. म्हणूनच सरकारने विरोधकांना चर्चेसाठी बोलवावे. नाही तर सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी विरोधकांना कोर्टात जावे लागेल. मुळात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही. मेहतांना माहिती नाही की, ९५ ए सेक्शननुसार गृहनिर्माण मंत्र्यांना रहिवाशांवर सक्ती करून घरे खाली करण्याचे अधिकार आहेत. मुळात पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी पावसाळ्यात याठिकाणी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याची गरज होती.