हाऊसिंग सोसायट्यांनाही ‘त्या’ बिलांचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:32 AM2020-07-29T01:32:10+5:302020-07-29T01:32:49+5:30

वाढीव वीजबिलांनी हैराण : ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी

Housing societies are also shocked by 'those' bills | हाऊसिंग सोसायट्यांनाही ‘त्या’ बिलांचा शॉक

हाऊसिंग सोसायट्यांनाही ‘त्या’ बिलांचा शॉक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरासरी वीजबिलांसह वाढीव वीजबिलांनी घरगुती वीजग्राहकांचे कंबरडे मोडले आहे़ हाऊसिंग सोसाट्यांनाही सरासरी वीजबिले आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे वीजदरात वाढ झाल्याने आलेल्या वीजबिलात आणखी वाढ झाली आहे. परिणामी यावर तोडगा काढत हाऊसिंग सोसायट्यांना दिलासा द्यावा, असे म्हणणे गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे.
मुंबई शहरात बेस्ट तर मुंबईच्या उपनगरात महावितरण, टाटा आणि अदानी या वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जातो. या सर्वच वीज कंपन्यांनी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या काळात आपल्या वीजग्राहकांना सरासरी वीजबिले पाठविली आहेत. कारण लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना मीटर रीडिंग करता आलेले नाही. शिवाय याच काळात झालेल्या वीज दरवाढीमुळे वीजबिलात मोठी वाढ झाली आहे. शिवाय या तीन महिन्यात काढण्यात आलेली सरासरी वीजबिले ही जानेवारी, फेब्रुवारी महिन्याच्या बिलावर काढण्यात आली होती. या काळात हिवाळा होता.
परिणामी वीज वापर कमी होता. त्यामुळे वीजबिलही कमी आले. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळ्यात विजेचा वापर वाढला. शिवाय लॉकडाऊनमुळे नागरिक घरी राहिल्याने विजेच्या वापरात भरच पडली आणि विजेच्या दरातही वाढ झाली.
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी सांगितले, कोरोनाच्या काळात सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. या काळात सोसायट्यांना आलेली वीजबिले ही मीटरचे रीडिंग न घेता पाठविण्यात आली आहेत. परिणामी आता तरी नीट मीटर रीडिंग घेत हाऊसिंग सोसायट्यांना वीजबिले पाठविण्यात यावीत.
महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामी विजेच्या दरात करण्यात आलेली वाढ रद्द करण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालावे.
मुंबई उपनगर जिल्हा को.आॅप. हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र मोरे यांनी सांगितले, पश्चिम उपनगरातील घरगुती वीजग्राहकांसह हाऊसिंग सोसायट्यांना मोठ्या रकमेची वीजबिले आली आहेत.
जिथे ४ ते ५ हजार वीजबिल येते. तेथे हे बिल दुप्प्पट आले आहे. यावर दिलासा म्हणून ठोस निर्णय घेण्यात यावा.

Web Title: Housing societies are also shocked by 'those' bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.