हाउसिंग सोसायट्या, बांधकामांना फटका, टँकर कोंडीमुळे दुसऱ्या दिवशी काही भागांतील नागरिकांचे पाण्याअभावी हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:09 IST2025-04-12T11:07:17+5:302025-04-12T11:09:58+5:30

Mumbai News: मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने बंद केलेल्या पाणीपुरवठ्याची झळ सलग दुसऱ्या दिवशी ही मुंबईतल्या काही भागांतील हाउसिंग सोसायट्यांना बसल्याचे दिसून आले. एकीकडे चेंबूर, मालाड, कांदिवली आणि चांदिवली येथे पाण्याची टंचाई असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

Housing societies, construction projects hit, tanker congestion causes water shortage in some areas for the next day | हाउसिंग सोसायट्या, बांधकामांना फटका, टँकर कोंडीमुळे दुसऱ्या दिवशी काही भागांतील नागरिकांचे पाण्याअभावी हाल

हाउसिंग सोसायट्या, बांधकामांना फटका, टँकर कोंडीमुळे दुसऱ्या दिवशी काही भागांतील नागरिकांचे पाण्याअभावी हाल

 मुंबई - मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने बंद केलेल्या पाणीपुरवठ्याची झळ सलग दुसऱ्या दिवशी ही मुंबईतल्या काही भागांतील हाउसिंग सोसायट्यांना बसल्याचे दिसून आले. एकीकडे चेंबूर, मालाड, कांदिवली आणि चांदिवली येथे पाण्याची टंचाई असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या भागांतील रहिवासी आधीच पालिकेच्या कमी दाबाच्या पाण्यामुळे हैराण असून, इतर दैनंदिन कामे करण्यासाठी त्यांच्याकडे टँकरच्या पाण्याची उपलब्धता नसल्याने त्रासले. 

टँकर बंद झाल्याने चेंबूर पश्चिमेतील टिळकनगर कॉलनीत परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. तेथील जवळपास १६० इमारतींमध्ये विशेषतः बिल्डिंग क्रमांक ७० मध्ये पालिकेकडून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यात खासगी टँकरच्या संपामुळे त्यांना आणखी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक रहिवाशांनी एम-पश्चिम वॉर्ड कार्यालयात संपर्क साधला, मात्र, त्याचा उपयोग झाला नाही, असे रहिवाशांनी सांगितले. 

चांदिवली सिटिझन वेल्फेअर असोसिएशनने लिलियम लँटाना या सोसायटीमधील वाढत्या पाणीटंचाईबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली.  मात्र, त्याचा उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

महापालिकेला पत्र 
कांदिवली पश्चिमेतील ठाकूर गावातील एव्हरशाईन हॅली टॉवर्सचे अध्यक्ष डॉ. के. के. सिंह यांनी असिस्टंट इंजिनिअर यांना पत्र लिहून १० पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.  या पत्रात सोसायटीतील तीव्र पाणीटंचाईचा उल्लेख आहे. जेथे रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
फाइट फॉर राइट फाउंडेशनच्या विनोद घोलप यांनी मालाड पश्चिमेतील ऑर्लेम, वलनाई रायपाडा आणि नूतन कॉलनीतील एसआरए इमारतींमधील तीव्र पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. परिसरातील रहिवासी दैनंदिन गरजांसाठी पाण्याच्या शोधात धावपळ करत असल्याचे चित्र त्यांनी मांडले. 

Web Title: Housing societies, construction projects hit, tanker congestion causes water shortage in some areas for the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.