खासगी लसीकरणासाठी गृहनिर्माण सोसायट्या सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:08+5:302021-06-17T04:06:08+5:30
मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी अजून तरी महापालिकेकडून लसीकरण मोहीम सुरू ...
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी अजून तरी महापालिकेकडून लसीकरण मोहीम सुरू झालेली नाही. महापालिकेच्या नियमानुसार खासगी हॉस्पिटल व गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पालिकेच्या परवानगीने लसीकरण माेहीम राबवता येते. त्यामुळे पश्चिम उपनगरात खासगी हॉस्पिटल व गृहनिर्माण संस्थांनी एकत्र येऊन १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली असून, तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
पश्चिम उपनगरातील विविध राजकीय पक्षांचे आमदार, नगरसेवक यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणासाठी खासगी हॉस्पिटलकडून सुमारे ७८०, ८५० ते १००० पर्यंत दर आकारले जात असून, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात किंवा हॉलमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येते. बाहेर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन रांग लावून लस घ्यायची, यापेक्षा पैसे गेले तरी चालतील, पण कोरोनापासून बचाव होण्यासाठी आपल्या सोसायटीच्या आवारात आपल्या सदस्यांना लस देण्यासाठी अनेक गृहनिर्माण संस्था पुढे आल्या आहेत. तरुणांचे आणि येथील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी पश्चिम उपनगरात अनेक गृहनिर्माण सोसायट्या पुढे आल्याचे चित्र आहे.
* दिंडोशीत घेतली ५५० नागरिकांनी लस
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर व आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी शिवसेना शाखा क्रमांक ४४चे शाखाप्रमुख सुभाष धानुका यांच्यामार्फत व दिंडोशी डेपोच्या मागे असलेल्या लाईफलाईन हॉस्पिटलमार्फत वसंत व्हॅली कॉम्प्लेक्स येथील नागरिकांसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सुमारे ५५० नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.
या मोहिमेचे उद्घाटन बुधवारी सकाळी आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते झाले. यावेळी कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले, लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉ. अनिरुद्ध आंबेकर, विधानसभा संघटक संतोष धनावडे, उपविभागप्रमुख प्रदीप ठाकूर, शाखाप्रमुख सुभाष धानुका, रोट्रॅक्ट क्लब ऑफ मुंबई वेस्टर्न इलाईटच्या तनुश्री सराफ व हर्षवर्धन सराफ तसेच बिपीन पटेल, संदीप पोवार, मुराद खान, चेतन वेस्वीकर, प्रिया शर्मा, रोमेश मिर्ज़ा, रमेश शिंदे, राजेश जंगम, कैलाश मुरारका, आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------------------