हौसिंग सोसायटीच्या सभासदांना आता ऑनलाइन तक्रारीची सोय; सर्व प्रश्नांची मिळणार उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 08:24 AM2023-11-18T08:24:36+5:302023-11-18T08:26:52+5:30
शेअर सर्टिफिकेटपासून सर्व प्रश्नांची मिळणार उत्तरे
मुंंबई- हौसिंग सोसायटीत सतत काही ना काही कुरबुरी सुरू असतात. अनेकदा सदस्यांचे प्रश्न, तक्रारी आणि समस्या सुटत नाहीत. सहकारी उपनिबंधक कार्यालयांच्या पायऱ्या चढून चपला झिजल्या तरी तक्रारींचे निराकरण होत नाही. हौसिंग सोसायटीच्या (सहकारी गृहनिर्माण संस्था) सभासदांच्या मदतीला आता ‘सहकार संवाद’ हे पोर्टल सुरू झाले आहे. त्यामुळे आता शेअर सर्टिफिकेटपासून सोसायटीत निधीचा अपहार, वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणे यासारख्या तक्रारी आता घरबसल्या ऑनलाइन दाखल करता येणार आहेत.
पोर्टलवर कोणती माहिती आहे?
पोर्टलवर तक्रार दाखल करण्याव्यतिरिक्त सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू असणारे कायदे, नियम व परिपत्रके याबाबतची माहिती उपलब्ध आहे. जिल्हा व राज्य फेडरेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसह योजना आणि प्रशिक्षणाची माहिती उपलब्ध आहे. याचा फायदा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि पदाधिकाऱ्यांना होणार आहे.
तातडीने कारवाई हाेणार
सभासद निबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली आहे; याबाबतची माहिती ऑनलाइन पद्धतीने पाहू शकतील. निबंधक कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता राहणार नाही. पारदर्शक पद्धतीने तक्रारींचे निवारण होण्यास मदत होईल.
तक्रार कशी करायची?
- पोर्टलवर हौसिंग सोसायटीचे सभासद निबंधक कार्यालयाकडे ऑनलाइन पद्धतीने २४ तासांत कधीही तक्रार दाखल करू शकतील.
- तक्रार दाखल केल्यावर ती संबंधित निबंधकांकडे ऑनलाइन पद्धतीने जाईल.
- तक्रारदाराला त्याच्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जाईल.
- तक्रार अर्जाशी संबंधित कारवाईची माहिती तक्रारदाराला त्याच्या लॉग इन आयडीवरून घेता येईल.
- तक्रारदाराचे अतिरिक्त म्हणणे असल्यास तक्रार निकाली निघेपर्यंत तो पोर्टलवर सादर करू शकेल.
- सुरूवातीला तक्रारदाराला २०० शब्द व १ एमबीपर्यंतची कागदपत्रे अपलोड करून तक्रार दाखल करता येईल.