वृद्ध दाम्पत्याच्या डब्यासाठी ह्यूस्टन ते मुंबई, व्हाया फ्रँकफर्ट – नागपूर अशी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:34 PM2020-04-11T17:34:08+5:302020-04-11T17:34:44+5:30
एका सकारात्मक आणि माणुसकीची साखळीचा अनुभव विलेपार्ल्यातील वृद्ध दाम्पत्याला. एका डब्यासाठी थेट ह्युस्टन ते मुंबई व्हाया फ्रँकफर्ट आणि नागपूर अशी सूत्रे हलली.
मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात एरवी अगदी साधी वाटणारी बाब सामान्य नागरिकांशी प्रचंड अडचणींची बनत असल्याची उदाहरणे समाजात दिसत आहेत. तर, त्यावर मात करण्यासाठी विविध व्यक्ती, संस्थांची अनोखी साखळीच ठिकठिकाणी तयार होत आहे. अशाच एका सकारात्मक आणि माणुसकीची साखळीचा अनुभव विलेपार्ल्यातील वृद्ध दाम्पत्याला. एका डब्यासाठी थेट ह्युस्टन ते मुंबई व्हाया फ्रँकफर्ट आणि नागपूर अशी सूत्रे हलली.
‘कोविड१९’ च्या काळात देशभरात मदतीचे हात पुढे येत आहेत. त्याच पद्धतीने परदेशातही अनेक भारतीय आपापल्या ठिकाणी मदतीस सरसावले आहेत. विलेपार्ले येथील एका वृद्ध दाम्पत्याच्या जेवणाच्या डब्यासाठी चक्क ह्यूस्टन ते मुंबई व्हाया फ्रँकफर्ट आणि नागपूर अशी संदेशांची देवाणघेवाण झाली आणि अखेर त्या जोडप्याचा प्रश्न निकाली निघाला. विलेपार्ले येथे मुजुमदार हे वयोवृद्ध जोडपे राहते. त्यांचा ५२ वर्षीय मुलगा दिव्यांग असून सून ह्यूस्टन येथे भारतीय वकिलातीत नोकरीस आहे. संचारबंदीच्या काळात मुजुमदार कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. २२ मार्च रोजी त्यांना सांभाळणारी परिचारिका येऊ शकली नाही आणि भोजनाचा डबाही पोहोचला नाही. ह्यूस्टन येथे मुजुमदार यांच्या सुनेने हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भारत पटेल यांना मुंबईतील कुटुंबियांची अडचण सांगितली. ह्यूस्टन येथील हिं. स्व. संघाच्या व्हाटस् ॲप ग्रुपवर ‘यूथ फॉर सेवा’च्या नागपूरच्या अनिकेत यांना ही सर्व माहिती समजली. अनिकेत यांच्याकडून जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे राहणाऱ्या आदित्य यांच्याद्वारे हा निरोप मुंबईच्या अमेय केळकर यांना मिळाला. अमेय यांनी विलेपार्ले येथील संघ कार्यकर्ते जयेश शाह यांना संपर्क करून मुजुमदार कुटुंबियांची अडचण सांगितली. शाह यांनी मुजुमदार यांच्याच परिसरात राहणाऱ्या दिलीप सोनी यांच्या कानावर ही बाब घातली. मग, सोनी यांनी पुढाकार घेत मुजुमदार कुटुंबियांची सर्व व्यवस्था केली आणि त्याचा व्हिडीओ ह्यूस्टन येथे पाठवला. अशा प्रकारे ‘ह्यूस्टन ते मुंबई व्हाया फ्रँकफर्ट आणि नागपूर’ असे मदतीचे वर्तुळ पूर्ण झाले.