बंद कंपनीत आग लागलीच कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:07 AM2020-02-14T06:07:25+5:302020-02-14T06:07:39+5:30
पोलिसांकडून चौकशी सुरू; गौडबंगाल असल्याचा संशय
मुंबई : अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात गुरुवारी सकाळी रोल्टा कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रूमला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र ही कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे या आगीमागे गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जात असून एमआयडीसी पोलीस या प्रकरणी चौकशी करीत आहेत.
अंधेरी पूर्वच्या एमआयडीसी परिसरात बंद असलेल्या कंपनीच्या इमारतीच्या खिडक्या काचेच्या होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागल्याचे समजले. मात्र तोपर्यंत आतल्या आत आग पसरत गेली. याबाबत समजताच स्थानिक आणि शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. जवळपास साडेतीन ते चारच्या सुमारास काही प्रमाणात आग आटोक्यात आली. मात्र कंपनी बंद होती तर आग लागलीच कशी, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अथक परिश्रमाअंती अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या खिडक्या उघडल्या तेव्हा कुठे आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून चौकशी करण्यात यावी, अशी विनंती नगरसेवक तसेच स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
‘एमआयडीसी पट्ट्यात अशा प्रकारच्या अनेक इमारती आहेत, ज्या काचेच्या आहेत. त्यामुळे त्यांचे व्हेंटिलेशन योग्य प्रकारे होत नाही. अंधेरीतील इमारतीत कामगार नसल्याने मोठा धोका टळला. मात्र, भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी आम्ही एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. तसेच बंद कंपनीत आग कशी लागली याचीही सखोल चौकशी करण्याची विनंती पोलिसांना करण्यात येणार आहे.
- संदीप नाईक, स्थानिक नगरसेवक, शिवसेना