परमबीर सिंह यांची याचिका ‘जनहित याचिका’ कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:05 AM2021-03-31T04:05:12+5:302021-03-31T04:05:12+5:30
उच्च न्यायालयाचा सवाल; आज हाेणार सुनावणी! परमबीर सिंह यांची याचिका ‘जनहित याचिका’ कशी? उच्च न्यायालयाचा सवाल; आज हाेणार सुनावणी! ...
उच्च न्यायालयाचा सवाल; आज हाेणार सुनावणी!
परमबीर सिंह यांची याचिका ‘जनहित याचिका’ कशी?
उच्च न्यायालयाचा सवाल; आज हाेणार सुनावणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केली. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी घेण्याची तयारी दर्शविली असली तरी ही याचिका ‘जनहित याचिका’ कशी? असा सवाल उच्च न्यायालयाने मंगळवारी उपस्थित केला.
परमबीर सिंह यांनी याचिकेत केलेल्या मागण्यांवर बोट ठेवत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ही याचिका ‘जनहित याचिका’ कशी, असा प्रश्न केला. त्यावर ज्येष्ठ वकील विक्रम नानकानी यांनी बुधवारच्या सुनावणीत यावर युक्तिवाद करू, असे म्हटले.
पुरावे नष्ट करण्यापूर्वी अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल त्वरित, नि:पक्षपाती चौकशीची मागणी सिंह यांनी केली आहे. पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांमध्ये राजकीय नेत्यांकडून हस्तक्षेप हाेतो. तो यापुढे केला जाऊ नये, तसेच पैसे घेऊन नियुक्ती किंवा बदल्या होऊ नयेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत आहे.
स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अहवाल आणि त्याच्याशी संबंधित गृह विभागाची फाईल न्यायालयात सादर करण्याचे, तसेच देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज स्वतंत्र तपास यंत्रणेला ताब्यात घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही सिंह यांनी केली.
देशमुख यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्या घरी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्याबरोबर बैठक घेतली. त्या दोघांना दरमहा १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असेही सिंह यांच्या याचिकेत नमूद आहे.
* अशा याचिका प्रसिद्धीसाठी करण्यात येतात; उच्च न्यायालय याचिकाकर्तीवर वैतागले
अनिल देशमुख यांच्यासह परमबीर सिंह व अन्य जणांची भ्रष्टाचार केल्याप्रकणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका व्यवसायाने वकील असलेल्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. सकृतदर्शनी ही याचिका प्रसिद्धी मिळविण्यासाठी केल्याचे मत न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांनी व्यक्त केले.
‘तुम्ही म्हणता की तुम्ही गुन्हेगारीविषयक डॉक्टरेट केली आहे. याचिकेत तुम्ही तयार केलेला एकतरी परिच्छेद आम्हाला दाखवा. याचिकेतील सर्व मजकूर पत्रातून ‘कॉपी-पेस्ट’ केलेला आहे. ‘तुम्हाला ही याचिका दाखल करण्याचा अधिकार काय?’, असा सवालही न्यायालयाने केला. त्यावर पाटील यांनी याबाबत आपणच आधी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती न्यायालयाला दिली, तसेच राज्य सरकारनेही ही याचिका दाखल करून घेण्यावर आक्षेप घेतला. दरम्यान, न्यायालयाने अशाच स्वरूपाच्या दाखल केलेल्या अन्य याचिकांबरोबर ही याचिका एकत्र करून घेण्याची सूचना महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना करीत दोन दिवसांनी सुनावणी ठेवली.
........................