Join us

फ्लॅटची तक्रार कशी, कुठे? सांगणार आता महारेरा; वेबसाइट १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 8:38 AM

सर्वांच्या प्रत्यक्ष अडचणी प्रशिक्षण काळामध्ये सोडविण्यासाठी महारेराकडून मदतही केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घर घेताना आणि घेतल्यानंतर अडचण आली तर कुठे आणि कशी तक्रार करायची, तक्रार केल्यानंतर पुढे काय करायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता महारेरा देणार आहे. त्यातही महारेरा केवळ ग्राहकांपुरतेच मर्यादित राहणार नाही तर बिल्डर, एजंट, वकील यांनाही स्वतःची नवी वेबसाइट 'महाकृती' कशी वापरायची? याबाबतचे ट्रेनिंग देणार आहे.

महारेराची वेबसाइट १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुरू होणार असून, दोन आठवड्यांसाठी हे ट्रेनिंग होणार आहे. यात तक्रारी कशा नोंदवाव्यात आणि त्याची पुढील प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. त्यात वकिलांचाही समावेश असेल. बिल्डर व त्यांच्या संस्था यांना नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, गरजेनुसार दुरुस्ती, नूतनीकरण, तीन महिन्यांचा प्रगती अहवाल, वार्षिक प्रगती अहवाल, प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दलचे प्रपत्र ४ या नेहमीच्या कामांसाठी वेबसाइटचा वापर कसा करायचा? याबाबतही माहिती दिली जाईल. तसेच एजंटनाही नोंदणी, दुरुस्ती, नूतनीकरण अशा कामांबाबतही मार्गदर्शन केले जाईल. या सर्वांच्या प्रत्यक्ष अडचणी प्रशिक्षण काळामध्ये सोडविण्यासाठी महारेराकडून मदतही केली जाणार आहे.

- १ सप्टेंबरला प्रशिक्षण

- १ सप्टेंबरला वेबसाइट सुरु होण्यापूर्वी २९ आणि ३० ऑगस्ट रोजी बिल्डर आणि त्यांच्या संस्था, एजंटस, तक्रारदार आणि बिल्डरांचे वकील आणि महारेराची अंतर्गत यंत्रणा यांना मार्गदर्शन केले जाईल.

महाकृती ही वेबसाइट १ सप्टेंबरपासून सुरू होईल. बिल्डरांची नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी आणि तत्सम कामे, एजंट नोंदणी आणि इतर कामे तसेच तक्रारदार आणि बिल्डर यांचे वकील यांना महारेराशी संबंधित असलेली विविध कामे सुलभतेने करता यावी यासाठी वेबसाइटवर नवीन बाबी आहेत. त्याचा प्रत्यक्ष वापर करताना कुणालाही अडचण येऊ नये म्हणून मार्गदर्शन, मदत करण्यासाठी ट्रेनिंग आहे. - अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा

टॅग्स :मुंबई