Join us

माझ्या दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची कशी?; जेईईच्या टॉपर्सची आयआयटीकडे विचारणा

By रेश्मा शिवडेकर | Published: June 09, 2024 9:42 PM

जेईई-अॅडव्हान्सचा कटऑफ यंदा चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षी खुल्या गटाचा कटऑफ २३.८९ टक्के इतका होता.

मुंबई : जेईई-अॅडव्हान्समधील आतापर्यंतच्या सर्व टॉपर्सच्या गुणांचे रेकॉर्ड तोडत ३५५ इतक्या भरघोस गुणांची कमाई करणाऱया वेद लाहोटी याला सध्या एक… नव्हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. ते म्हणजे ३६० गुणांच्या परीक्षेतील आपल्या दोन प्रश्नांचे उत्तर चुकीचे कसे?

लहानपणापासून कुठल्याही गोष्टीवर लॉजिकल उत्तर शोधण्याची सवय असलेला वेद परीक्षेत त्याने लिहीलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराबाबतही काटेकोर असे. म्हणून शिक्षकांनी आपल्या उत्तरासाठी एखादा जरी मार्क कापला, तर तो का कापला म्हणून आजोबांचे डोके खात असे. आताही त्याच्या दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची का ठरवली, अशी विचारणा त्याने आयआयटीकडे केली आहे.

वेदला मिळालेले ३६० पैकी ३५५ हे आतापर्यंतचे सर्वाधिक गुण आहेत. त्याने जेईई-मेनमध्येही ३०० पैकी २९५ गुणांची कमाई केली होती. त्याने अजून तरी कुठल्या इंजिनिअरिंगच्या शाखेला किंवा कुठल्या संस्थेला प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलेले नाही.

मूळचा इंदूरचा असोल्या  वेदची आई जया गृहिणी असून, वडील योगेश बांधकाम व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. दहावीला ९८.६० टक्के तर बारावीला ९७.६० टक्के गुणांची कमाई केलेला वेद गेली सात वर्षे जेईईची तयारी करत होता. ऑलिंपियाड स्पर्धेतही त्याने अव्वल कामगिरी केली आहे. नवनवीन विषयांवर वाचायला त्याला आवडते.

स्मार्टवर्कवर त्याचा भर राहिला आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन करत असल्याने आठ तासाच्या झोपेशी तडजोड करणे त्याला मान्य नाही. गणित आणि भौतिकशास्त्र हे त्याचे आवडते विषय तर चेस आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ आहेत. याशिवाय त्याला वाचन आवडते. त्याला टिव्ही किंवा चित्रपट पाहायला आवडत नाही. दहावीनंतर जेईईच्या तयारीसाठी त्याने कोटाची निवड केली. त्यावेळी आई सदैव त्याच्यासोबत होती. कोटातील स्पर्धात्मक वातावरणात अभ्यास करायला आवडत असल्याचे वेद सांगतो.

जेईई-अॅडव्हान्सचा कटऑफ वाढलाजेईई-अॅडव्हान्सचा कटऑफ यंदा चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षी खुल्या गटाचा कटऑफ २३.८९ टक्के इतका होता. यंदा तो ३०.३४ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी चांगलीच चढोओढ असेल. २०२२ आणि २०२१ मध्ये तर तो अनुक्रमे १५.८९ टक्के आणि १७.५० टक्के इतका होता. ओबीसींचा कटऑफही गेल्या वर्षीच्या २१.५० वरून २७.३० टक्क्यांवर गेला आहे. त्या आधी तो १३ ते १५ टक्क्यांच्या आसपास होता. तर एससीचा ११.९५वरून १५.१७वर गेला आहे. एसटीचा ११.९५ वरून १५.१७ टक्क्यांवर गेला आहे.

मुलींची संख्या वाढलीगेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटी प्रवेशाकरिता पात्र ठरलेल्या मुलींची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी ७,५०९ इतक्या मुली प्रवेश पात्र ठरल्या होत्या. यंदा हा आकडा ७,९६४ इतका आहे. त्या आधीच्या वर्षी ६,५१६ इतक्या मुली प्रवेश पात्र ठरल्या होत्या.

आयआयटीच्या उपलब्ध जागा२०२४ - १७,७४०२०२३ - १७,३८५

टॅग्स :मुंबईपरीक्षा