Join us

Corona Virus: मुंबईत गर्दीची ठिकाणे टाळणार कशी?; सर्वसामान्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 5:52 AM

तर अशा ठिकाणी जाणे टाळण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : कोरोनापासून बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात असला तरी मुंबईसारख्या महानगरात गर्दी टाळताच येणार नाही, अशी स्थिती आहे. प्रचंड गर्दीची रेल्वे स्थानके, गच्च भरलेल्या बेस्ट गाड्या, मंत्रालयातील प्रचंड गर्दीची ठिकाणे टाळणार कशी, असा सवाल सर्वसामान्यांना सतावत आहे. पोटापाण्यासाठी घराबाहेर पडत गर्दीचा चेहरा होणे अपरिहार्य आहे. त्यामुळेच मनात कोरोनाचे भय बाळगत आणि यातून कसेबसे स्वत:ला सावरत, काही मुंबईकर मास्क तर काही जण रुमाल तोंडावर ठेवून स्वत:ची काळजी घेत दैनंदिन व्यवहारात गुंतले आहेत.

रेल्वे स्थानक, मंत्रालय, शाळा-महाविद्यालय असो वा मॉल... आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांनी याविषयी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. मात्र दिनक्रमात अशा ठिकाणी जायचे झाल्यास स्वच्छता पाळली पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सर्दी झाल्यावर बेडका असेल व नाक वाहत असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही; कारण सुका खोकला व नाक वाहत नसेल तर अशी सर्दी कोरोना व्हायरस न्यूमोनिया असू शकतो. कोरोना विषाणू हा उच्च तापमान ३०-३५ ला जिवंत राहू शकत नाही. म्हणून अधिकाधिक गरम पाणी प्या. सूर्यप्रकाशात जाणे हा उपचार नसून प्रतिबंधात्मक उपाय आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र)चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.प्रतिबंधात्मक उपाय

  • सर्वसामान्यपणे लोकांमध्ये स्पर्शाने संसर्ग होऊ शकतो म्हणून वारंवार हात धुणे आवश्यक आहे. विषाणू हा तुमच्या हातावर
  • ५ ते १० मिनिटेच जिवंत राहू शकतो; परंतु त्याच ३ ते १० मिनिटांत तो भरपूर नुकसान करू शकतो.
  • तुम्ही तुमचे डोळे चोळू शकता किंवा नाक पुसू शकता. त्यामुळे मास्क उपलब्ध नसेल तर गरम पाण्यात धुतलेल्या स्वच्छ रुमालाचा वापर करावा.
  • हात धुण्याव्यतिरिक्त कोमट पाण्याने गुळण्या करू शकता, यामुळे जर विषाणू तुमच्या घशात असतील तर फुप्फुसात जाण्याअगोदर ते तुम्ही काढू शकता किंवा कमी करू शकता.
टॅग्स :कोरोना