नवी मुंबई - पँथरच्या काळात मी अनेकांना ठोकून काढले आहे. अनेकांना जेल मध्ये घातले आणि अनेकांना जेल बाहेर काढले आहे. ठोकाठोकी करणारे पँथर माझ्या सोबत आजही आहेत. ठोकून काढायला सुरुवात केली तर एकालाही सोडणार नाही.अनेकांना ठोकून काढले नसते तर मंत्रीपदापर्यंत पोहोचलो नसतो असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नवी मुंबई येथील दिघा येथे दिला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मिडियावर मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा असं वक्तव्य केले होते.
यावेळी तुर्भे येथील भारिप बहुजन महासंघाचे विभाग अध्यक्ष विजय गायकवाड, अप्पा माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मोठया संख्येने लोक उपस्थित होते.
प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी मी आहे सच्चा आंबेडकरवादी अशी चारोळी करत रामदास आठवले यावेळी म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी, निळ्या झेंड्याशी एकनिष्ठ राहून मी काम करीत आहे. मी कुणावर टीका करीत नाही. मी दिल्लीत पोहोचलेलो नेता आहे, हे भारतातील गल्लीगल्लीत माहीत आहे. मी मनाने बौद्ध आहे. माझ्या मनात कुणाबद्दल घृणा आणि घमेंड नाही. आम्ही आमची भूमिका मांडत आहोत.विष्णुनगर सारख्या नगरांमधील सामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहिली म्हणून मंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहे
इतरांच्या सभा मोठया होतात त्या प्रमाणे माझ्याही सभा मोठया होतात. संविधान कोणी बदलू शकत नाही, संविधानाला हात लावायचा प्रयत्न कोणी केला तर त्यांचे हात तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच रामदास आठवले यांनी दिला.