मुंबई : चार भिंतींच्या आड ‘पोकर’ खेळल्यास तो जुगार कसा, याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मागितले आहे. पोकर हा खेळ आहे की जुगार आहे, याबाबत निर्णय घेण्यासंबंधी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे.काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गोरेगाव येथील एका इमारतीवर धाड टाकून २९ जणांना पोकर खेळत असल्याबद्दल अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधित कायद्यांतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविले. त्यांनी गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे.गेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारला या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यावर गुजरात सरकारने पोकर जुगार असल्याने बंदी घातली आहे, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने म्हटले की, सणासुदीच्या दिवसांतही पैसे लावून खेळ खेळण्यात येतात. त्याचे काय, त्यामुळे खासगी जागेत चार भिंतींच्या आड पोकर खेळणे जुगार कसा, असा सवाल केला. आरोपी नासिर पटेल याने दाखल केलेल्या याचिकेनुसार, कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता पोकर खेळल्यास तो गुन्हा ठरू शकत नाही, असे कर्नाटकसह देशातील अन्य उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे या सर्वांवरील गुन्हा रद्द करावा, अशी विनंती आरोपींच्या वकिलाने न्यायालयाला केली. खासगी जागेत मित्रांसोबत पोकर खेळणे, हा जुगार कसा, असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उपस्थित केला.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टिप मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी राहात असलेल्या इमारतीवर धाड टाकली. तिथे हे सर्व आरोपी पैसे लावून पोकरचा पत्त्यांचा खेळ खेळत होते. चौकशी केल्यानंतर नासिर तेथील कॅशिअर असल्याचे समजले. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.
चार भिंतींत ‘पोकर’ खेळल्यास जुगार कसा? उच्च न्यायालयाने सरकारकडून मागितले स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 1:26 AM