मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीचा शनिवारी सकाळी मुंबईत अपघात झाला. मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर ही घटना घडली असून, महिनाभरात हा तिसरा प्रकार आहे. दरवेळी गाडीसमोर दुचाकीस्वार येत असल्याने संशय व्यक्त होत असून याबाबत पोलिसांनी सुमोटो घ्यावा, असे दरेकर यांनी शनिवारी ‘लोकमत’ला सांगितले.
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनाला जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड दुचाकीस्वाराने धडक दिली. मात्र, या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, गाड्यांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये त्यानंतर खंडाळा आणि शनिवारी मुंबईत त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात अद्याप त्यांच्याकडून कोणीही तक्रार करण्यास आलेले नाही. त्यामुळे पुढील चौकशी कशी करणार? असा सवाल पोलिसानी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र
- दुसरीकडे याप्रकरणी दरेकर यांच्याकडे ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, तक्रार करण्यासाठी कोणी गेले नसल्याचे खरे असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती घेतली आहे.
- मी राज्यभरात पक्षाच्या कामासाठी फिरत असतो. माझ्या गाडीला महिनाभरात झालेला हा तिसरा अपघात आहे. दरवेळी गाडीसमोर दुचाकीस्वार आल्यामुळे अपघात झाला आहे.
- शनिवारीदेखील मुंबईत असताना गाडीसमोर दुचाकीस्वार आला आणि गाडीचा अपघात झाला. त्यामुळे मला यामध्ये घातपाताचा संशय येत आहे. तसेच याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचेही दरेकरांनी स्पष्ट केले आहे.