मुंबईः मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला आहे. यातील काही जण राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून आलेले असतानाही त्यांना थेट मंत्रिपद दिलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही यावर प्रश्न उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, भाजपानं स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे केले आहेत काय?.एखाद्या व्यक्तीनं पक्षाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पुन्हा निवडून यावे लागते. पुन्हा निवडून न येता खालच्या किंवा वरच्या सभागृहाचे सदस्य नसताना मंत्रिपदाची शपथ घेता येत नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं, भाजपामध्ये निष्ठावंतांना मागे ठेवलं जातं असल्याची टीकाही अजित पवारांनी केली आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.अशा प्रकारचा कुठलाही कायदा नाही, जर एखादी व्यक्ती पात्र असेल तर भारतीय संविधानानं तिला मंत्री बनण्याचा अधिकार दिला आहे. मग तो कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना 6 महिने मंत्रिपदी राहू शकतो. फक्त विरोधी पक्षाचा सदस्य असताना त्याला मंत्री होता येत नसल्याचाही खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प जाणार असल्याचं सांगितलं आहे. अधिवेशनात 13 नवीन विधेयक आणि विधान सभेतील प्रलंबित 12, विधान परिषदेतील प्रलंबित 3 अशी एकूण 28 विधेयक चर्चेला येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. गेली 5 वर्ष सर्व समाजाला समोर ठेवून निर्णय घेतले. आव्हानांना सकारात्मकतेने पुढे गेल्यामुळे जनतेने विश्वास दाखविला. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलल्याने वैद्यकिय प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात यश आले आहे. धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.