सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शहाजोग सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:10 PM2020-09-14T13:10:38+5:302020-09-14T13:11:18+5:30

कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या विमा कवच यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

How can the government forget its responsibility ?, Raj Thackeray's advice to Uddhav Thackeray | सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शहाजोग सल्ला

सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शहाजोग सल्ला

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिवसेनेमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. खासगी डॉक्टरांच्या मुद्द्यावरून राज यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला खडे बोल सुनावले आहेत. कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या विमा कवच यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

राज ठाकरे लिहितात, मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. त्यांनी त्यांचे ह्या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली, त्याने माझं मन विषण्ण झालं. मुळात जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे, तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे?, याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं  तर काय म्हणायचं?, सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? चूक आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, तुम्ही या विषयांत तात्काळ लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खासगी सेवेतील असो वा सरकारी सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी असोत यांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करा. आपण या विषयांत डॉक्टर्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय द्याल, अशी मला आशा आहे.

 

माझ्या माहितीप्रमाणे राज्यातील बहुसंख्य खासगी सेवेतील डॉक्टर्सनी आणि इतर खासगी  वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांची त्यांच्या व्यवसायाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णांची सेवा सुरू ठेवली. यातच महाराष्ट्र सरकारचं अजून एक परिपत्रक आलं की, कोरोनाच्या काळात डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी मग ते खासगी सेवेत असोत की सरकारी रुग्णालयांच्या सेवेत असोत ह्या सगळ्यांना विम्याचं कवच असेल आणि जर यांपैकी कोणाचाही कोव्हिडमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला या विम्यातून ५० लाख रुपये दिले जातील. पण आता खासगी  सेवेतील डॉक्टरांचा कोरोना काळात सेवा देताना कोव्हिडमुळे मृत्यू झाला तरी त्यांच्या कुटुंबाला विम्याचा लाभ  देण्याचं सरकार नाकारत आहे आणि कारण पुढे केलं जात आहे की, डॉक्टर खासगी सेवेत होता. 

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलं होतं. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात असं सांगत शिवसेनेने राज ठाकरेंना साद घातली होती. तेव्हा बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल, असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले होतं.

Web Title: How can the government forget its responsibility ?, Raj Thackeray's advice to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.