गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिवसेनेमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. खासगी डॉक्टरांच्या मुद्द्यावरून राज यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला खडे बोल सुनावले आहेत. कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या विमा कवच यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे लिहितात, मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. त्यांनी त्यांचे ह्या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली, त्याने माझं मन विषण्ण झालं. मुळात जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे, तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे?, याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?, सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? चूक आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, तुम्ही या विषयांत तात्काळ लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खासगी सेवेतील असो वा सरकारी सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी असोत यांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करा. आपण या विषयांत डॉक्टर्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय द्याल, अशी मला आशा आहे.
सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शहाजोग सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 1:10 PM