मुंबई : आजकाल लग्नाळू मुलांची संख्या अधिक आणि लग्नेच्छुक मुलींचे प्रमाण कमी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. लग्नासाठी जोडीदार मिळणे महाकठीण बनले आहे. त्यातही मुलींच्या भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा वाढल्याने विवाह मंडळांचे दार ठोठावूनही अनेक मुलांची ‘स्वप्नपूर्ती’ होताना दिसत नाही.
लग्नगाठी स्वर्गातच जुळून येतात, असे आपल्याकडे म्हटले जाते. आजकाल लग्न जमवणे हा व्यवसाय बनला आहे. ही मंडळी आपल्या मागणीनुसार स्थळे दाखवतात. त्यामुळे १५ ते २० हजार रुपये मासिक उत्पन्न आणि मोठे कुटुंब असलेल्या लग्नाळू मुलांचे हाल बेहाल आहेत. कारण विवाह मंडळांकडे एकापेक्षा एक सरस पर्याय उपलब्ध असल्याने बहुतांश मुली गलेलठ्ठ पगार, नोकरीत स्थिरता आणि छोटे कुटुंब असलेल्या मुलांना प्राधान्य देतात. मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे वरपक्ष मात्र हैराण झाल्याचे दिसून येते.
-------------
अभियंते, सरकारी नोकरदारांना सर्वाधिक मागणी
- ‘आयटी’ क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांना मुलींकडून सर्वाधिक मागणी आहे. कारण सद्यस्थितीत गलेलठ्ठ पगार देणारे एकमेव क्षेत्र अशी ‘आयटी’ची ओळख आहे.
- सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. त्याशिवाय कायमची नोकरी असा शिक्का असल्याने सरकारी नोकरदारांनाही लग्नासाठी मागणी आहे.
- खासगी बँकांत उच्च पदावर काम करणाऱ्यांनाही मागणी आहे. दरवर्षी होणारी पगारवाढ, पदोन्नती मिळण्याची शाश्वती आदी कारणे यामागे आहेत.
-------------
अटी मान्य असतील तरच बोला...
वधू-वर सूचक मंडळांमध्ये नाव नोंदवताना ‘अटीं’साठी विशेष रकाना दिलेला असतो. मुलींच्या अर्जातील हा रकाना पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. एकुलता एक मुलगा, छोटे कुटुंब, अमुक लाख पगार, दिसायला राजबिंडा असल्यास प्राधान्य वगैरे वगैरे अशी लांबलचक यादीच त्यासोबत जोडली जाते. अटी मान्य असल्यासच फोन करावा, असा शेराही लिहिलेला असतो. त्यामुळे सर्वसाधारण कुटुंबातील मुलांनी लग्नाविना राहायचे का, असा सवाल संदेश मेस्त्री या तरुणाने ‘लोकमत’शी बोलताना केला.
---------------------
सुखी ठेवणारा जोडीदार निवडण्याऐवजी पैसेवाल्याशी लग्न करण्याकडे अनेक मुलींचा कल दिसून येतो. पण स्वभाव जुळले नाहीत, तर लग्नगाठ कशी घट्ट राहील याचा विचार त्या करीत नाहीत. त्यामुळे हल्ली घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पालकांनीही याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- विजय कासुर्डे, ज्ञानदीप वधूवर सूचक मंडळ, चुनाभट्टी
............
आपण जसे कष्टमय आयुष्य जगलो, तसे जीवन आपल्या मुलीच्या नशिबात येऊ नये म्हणून प्रत्येक पालक धडपडत असतो. त्यामुळे चांगले कुटुंब, उत्तम नोकरी आणि पगार असलेल्या मुलाच्या शोधात ते असतात. आपल्या मुलीचे वाईट व्हावे, अशी भावना कुठल्याच आई-वडिलांची नसते.
- दक्षता कदम, दक्षता मॅट्रीमोनी, अंधेरी
................
हल्ली मुली शैक्षणिकदृष्ट्या मुलांपेक्षा प्रगत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना सहजरीत्या चांगल्या पगाराची नोकरी मिळते. परिणामी आपला भावी जोडीदार आपल्याहून अधिक पगार घेणारा किंवा एखाद्या कंपनीत उच्च पद भूषवणारा असावा अशी त्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे.
- श्याम सावंत, सुयोग वधूवर सूचक मंडळ
-----------------------------------
माझा मुलगा उच्चशिक्षित असला, तरी त्याला अद्याप मोठ्या पगाराची नोकरी मिळालेली नाही. भविष्यात तो खूप प्रगती करू शकतो. मात्र, त्याचा सध्याचा पगार पाहून बऱ्याच मुली लग्नासाठी नकार देतात. त्याच्यासाठी वधू मिळत नसल्याने आम्ही हैराण झालो आहोत.
- भिकाजी नाईक, वरपिता
......................
आम्ही मुलीला चांगले शिक्षण दिले. चांगल्या संस्कारात वाढवले. त्यामुळे तिच्या तोडीस तोड वर मिळावा अशी अपेक्षा बाळगण्यात गैर काय?
- दिनेश गुरव, वधूपिता