क्रांतिकारकांचा अपमान करून पंतप्रधान कसे बनणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 06:17 AM2019-09-18T06:17:26+5:302019-09-18T06:17:36+5:30
काँग्रेसने कितीही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत. सावरकर हा एक विचार आहे.
मुंबई : काँग्रेसने कितीही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत. सावरकर हा एक विचार आहे. सावरकरांसारख्या देशभक्तांवर टीका करून राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान बनता येणार नाही. या देशातील नररत्नांवर टीका करण्यापेक्षा त्यांचा त्याग, शौर्याशी असलेल्या देशभावनांशी समरस व्हा. वीरांच्या शौर्यामुळेच पंतप्रधान पदाची गादी तरी आज तुम्हाला बघायले मिळतेय, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना फटकारले.
दादर येथील सावरकर स्मारक सभागृहात ‘वीर सावरकर’ या इंग्रजी पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी ठाकरे यांच्यासह लेखक विक्रम संपत, विधान परिषद उपसभापती नीलम गोºहे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर आदी उपस्थित होते. क्रांतिकार्य व दहशतवाद यात अंतर आहे. सावरकरांची हिंसा ही विधायक हिंसा होती. सावरकर परिपूर्ण क्रांतीचे पुरस्कर्ते होते. आज अंदमान पिकनिक स्पॉट झाला आहे. ज्याला मरणयातना देत रोज मारायचे असेल त्याची रवानगी इंग्रज अंदमानच्या तुरुंगात करीत. आम्ही नेहरू आणि गांधींनापण मानतोच. पण, या देशात काय फक्त दोनच घराणी जन्माला आली का? सावरकरांनी १४ वर्षे तुरुंगवास भोगला तसा तुरुंगवास १४ मिनिटे जरी भोगला असता तर मी नेहरूंनासुद्धा वीर म्हटले असते, असे ठाकरे म्हणाले.
इंग्रजांनी तुरुंगात केलेल्या छळापेक्षा १९२४ नंतर देशात त्यांची जी अवहेलना झाली ते भयंकर होते. सावरकर पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता, असे सांगत सावरकरांना भारतरत्न मिळायलाच हवे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. सावरकरांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही. मणीशंकर अय्यर आणि त्या विचारसरणीला आजही आम्ही भरचौकात जोड्याने मारू, असा इशाराही त्यांनी दिला.
>एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. औरंगाबादचा खासदार कसे काय गैरहजर राहू शकतो? जलील स्वत:ला निजामाच्या विचारसरणीचे गुलाम समजतात म्हणूनच गैरहजर राहिले. हा प्रकार लाजिरवाणा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.