काही कारणाने ते विमान मिळाले नाही म्हणून दुसऱ्या विमानाने प्रवास केला, अशा शब्दांत राज्यपालांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. एक विमान नाही आवडले तर दुसऱ्या विमानाने प्रवास केला, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. मात्र, खासगी दौरा असल्याने परवानगी नाकारली गेली का, असे विचारले असता ‘आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो?’ अशी विचारणा राज्यपालांनी केली.
* आतापर्यंतचे सर्वात अहंकारी सरकार - देवेंद्र फडणवीस
राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमतात. राज्यपालांना कुठे जायचे असेल तर ते सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहितात, त्यानंतर विभागाकडून आदेश काढला जातो. राज्यपालांकडून आजच्या प्रवासाबाबत आधीच पत्र पाठविले होते. मुख्यमंत्र्यांपर्यंतही हे पत्र पोहोचले; तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके अहंकारी सरकार मी पाहिले नव्हते. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळाले पाहिजे, राज्यपाल संवैधानिक पद आहे.
* दोघेही ओपन माइंडेड - छगन भुजबळ
विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी १२ नावे राज्यपालांकडे पाठवली, ती मंजूर केली नाहीत याबद्दल आम्ही बोललो तर हे षडयंत्र आहे का? असे म्हणत भाजपने महाविकास आघाडीच्या नावाने बोंब करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्यपाल कार्यालयात निर्माण झालेली दरी कमी झाली पाहिजे. बाकी दोघेही एकदम ओपन माइंडेड आहेत, त्यामुळे षडयंत्र वगैरै काही बोलू नका.
* सरकारला बदनाम करण्याचे कुभांड - विनायक राऊत
महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी रचलेले कुभांड तर नाही ना, अशी शंका आहे. सरकारच्या विमानाचा वापर शासकीय कामासाठी केला पाहिजे. कुणालाही त्याचा खासगी वापर करता येणार नाही. राज्यपालांना परवानगी दिलेली नव्हती तर त्यांना हे निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होते. ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे न कळवता विमानात बसवले, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे.
----------------------