चार कोटींची फायबरची बोट आम्हाला परवडणार कशी? गेटवे - एलिफंटा जलवाहतूक संस्थेचा सरकारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:34 IST2025-02-24T09:24:51+5:302025-02-24T09:34:54+5:30
बोट व्यावसायिकांना मिळणारे उत्पन्न, प्रवासी तिकिटाचे दर आणि बोटींच्या किमती यांची योग्य सांगड घालूनच याबाबत निर्णय घेता येईल

चार कोटींची फायबरची बोट आम्हाला परवडणार कशी? गेटवे - एलिफंटा जलवाहतूक संस्थेचा सरकारला प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेटवे ते एलिफंटा, अलिबाग जलवाहतूक करणाऱ्या लाकडी फेरीबोटी बदलून फायबरच्या बोटी वापरण्याचे राज्य सरकारचे निर्देश गेटवे एलिफंटा जलवाहतूक संघटनेला अंशतः मान्य आहेत. मात्र, एक लाकडी बोट ९० लाख ते दीड कोटी रुपयांत बांधता येते, तर फायबर बोटीची किंमत साडेतीन ते चार कोटींच्या आसपास असते.
त्यामुळे बोट व्यावसायिकांना मिळणारे उत्पन्न, प्रवासी तिकिटाचे दर आणि बोटींच्या किमती यांची योग्य सांगड घालूनच याबाबत निर्णय घेता येईल, परंतु सध्यातरी लाकडी बोटी सरसकट बदलणे शक्य नसल्याचे संघटनेचे सरचिटणीस इक्बाल मुकादम यांनी सांगितले.
सरसकट एकाचवेळी बोटी बदलणे अशक्य
गेटवे ऑफ इंडिया ते घारापुरी, अलिबाग, मांडवा या जलवाहतुकीच्या सेवेत सध्या १५० लाकडी बोटी आहेत. परंतु आता फायबर बोटी वापराव्यात, असे निर्देश सरकारने बोटमालकांना दिले आहेत. त्याबाबत गेटवे एलिफंटा जलवाहतूक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सकारात्मकता दर्शवली मात्र, प्रत्यक्षात सर्व गोष्टी एकाचवेळी बदलणे शक्य होणार नाही, अशी भूमिकाही घेतली आहे.
...तर पर्यटनावर परिणाम
सध्या गेटवे ते एलिफंटा प्रवासभाडे १५० रुपये आहे, तर अलिबाग दोनशे रुपये आहे. दररोज सुमारे २००० पर्यटक या सेवेचा लाभ घेतात.
तर शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सुमारे ६ हजार प्रवाशांची नोंद होते. फायबरच्या बोटी आणल्या तर तिकिटांचे दर १ हजार रुपये करावे लागतील. शिवाय, फायबर बोटींसाठी आम्हाला कर्ज काढावे लागेल. त्याचा मासिक हप्ता ६ लाख असेल. मग त्यासाठी उत्पन्न २ कोटी असायला पाहिजे. सध्याचे उत्पन्न ३० ते ४० लाख आहे. त्यामुळे पर्यटकांच्या खिशालाच हात घालावा लागेल. त्याचा पर्यटनावर मोठा परिणाम होईल, असे मुकादम म्हणाले.
लाकडी बोटीच टिकाऊ
मुकादम म्हणाले की, लाकडी बोटी सागापासून बनवल्या जातात. हे लाकूड महाग असले तरी ते शंभर वर्ष टिकते. या बोटी अधिक टिकाऊ आणि मजबूत आहेत. फायबरच्या बोटींना आमची हरकत नाही, मात्र त्यांची किंमत आवाक्याबाहेर आहे.
लाकडी बोटी आम्ही ९० लाख ते दीड कोटी रुपयांत तयार करतो, तर फायबर बोटी साडेतीन ते चार कोटी रुपयांच्या घरात आहेत. सध्या आम्ही एक फायबर बोट आणली आहे आणि दुसरीची ऑर्डर दिली आहे. संस्थेच्या माध्यमातून आम्ही ही खरेदी करत आहोत. बोट मालकाला फायबर बोट घेणे परवडत नाही.
विरोध नाही, अनुदान द्या
जलवाहतूक संस्था म्हणून फायबर बोटींना आमचा निश्चितच विरोध नाही परंतु या बोटी खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने आम्हाला अनुदान दिल्यास त्याचा निश्चितच विचार होऊ शकतो.