संकटी रक्षी शरण तुला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 03:17 AM2020-08-16T03:17:26+5:302020-08-16T03:21:15+5:30
ह्या वर्षीचा उत्सव कसा असेल, कसा असावा आणि आपण वर्तमान परिस्थितीतून काय बोध घ्यावा, कोरोना संकटावर संयमाने मात करण्यासाठी मनामनात दडलेला प्रेम, परोपकार, सद्गुणरूपी बाप्पाचा शोध घेऊन त्याचाच जागर घालून उत्सवातील उत्साह कसा द्विगुणित करावा याचा धांडोळा...
गणेशोत्सव म्हणजे जल्लोष! भक्ती, आस्था, सजावट, मिरवणुका... अनोखा उत्साह. बाप्पाच्या आगमनाची आतुरता कायमच असते. पण, ह्या वर्षी
ह्या जिव्हाळ्याच्या उत्सवातून जल्लोष वजा झालेला आहे. सणवारांवर कोरोना साथरोगाचे सावट आलेले आहे. नियम आले आहेत, बंधने आली आहेत; पण म्हणून काही उत्सव साजरा होणे थांबणार नाही. ह्या वर्षीचा उत्सव कसा असेल, कसा असावा आणि आपण वर्तमान परिस्थितीतून काय बोध घ्यावा, कोरोना संकटावर संयमाने मात करण्यासाठी मनामनात दडलेला प्रेम, परोपकार, सद्गुणरूपी बाप्पाचा शोध घेऊन त्याचाच जागर घालून उत्सवातील उत्साह कसा द्विगुणित करावा याचा धांडोळा...
आवाहन बुद्धीगणेशाचे!
- प्रवीण दवणे
।। देवा तुचि गणेशु,
सकलार्थ प्रतिप्रकाशु ।।
असे श्री गणेशाच्या बुद्धीप्रकाशाचे वर्णन साक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. बुद्धीचा प्रकाश हेच गणेशाचे आद्य रूप आहे. आपण या अमूर्ताला मूर्तीचे रूप दिले आणि बुद्धी गणेशाची पूजा केली. घराघरांत पूजिला जाणारा हा श्री गणेशोत्सव पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी सार्वजनिक केला. पूजेच्या निमित्ताने एकत्रित झालेल्या समाजाला संघटनेचे महत्त्व सांगितले. मनोरंजनाचे निमित्त करून मेळे, लोकनाट्य, भारुडे, व्याख्याने यांचे निमित्त करून स्वातंत्र्यासाठी जनजागरण सुरू केले.
लोकमान्य टिळकांना हाच बुद्धीगणेश अभिपे्रत होता. स्वत: तत्त्वचिंतक आणि विचारवंतांचे मेरूमणी असणाऱ्या लोकमान्यांना स्वातंत्र्योत्तर काळात गणेशोत्सवाचे जे अतिरंजनीकरण झाले ते मान्य झाले नसते, घराघरांतून बाहेर आलेल्या पण मूर्तीच्या उंचीत आणि नेपथ्याच्या लाखो रुपयांच्या चुराड्यात गुंतलेला गणेशोत्सव पाहून लोकमान्यांनी पुन्हा एकदा ‘भक्तांचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा अग्रलेख लिहायला मागे-पुढे पाहिले नसते, म्हणून या वर्षी कोरोनापर्वात पुन्हा एकदा सार्वजनिक स्वरूपातून आपल्या स्वत:च्या घरात झालेला छोटेखानी उत्सव, बुद्धीगणेशाच्या रूपाला भावेल असाच करायला हवा.
विख्यात गणेश मंडळे आता आॅनलाइन गणेशदर्शनाची सेवा उपलब्ध करून देणार आहेत. हे पाऊल खूपच स्वागतार्ह आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने बुद्धीगणेशाच्या मनाला समाधान वाटेल असेच आहे. केवळ प्रथा मोडू नये एवढ्याच भीतीने भक्तांनी गर्दी केली तर कोरोनाच्या सध्याच्या महामारीच्या काळात विघ्नहर्ता गणेशावर खूपच ताण पडू शकेल. एवढ्या सगळ्या नियमबाह्य लोंढ्यांमध्ये जर व्याधीचा फैलाव झाला तर दर्शनाचा आनंद बाजूला राहून उपचाराचीच धावाधाव करावी लागेल. म्हणून बुद्धीगणेशाचे आवाहन जाणून या वर्षी आपल्या घरात साध्या पण सात्त्विकपणाने केलेल्या पूजेतच रममाण होणे हीच यंदाच्या उत्सवाची गरज आहे. पुढील विघ्न टाळण्यासाठी तोच उपाय आहे.
मूर्तीच्या बेसुमार उंचीतच प्रतिष्ठेची उंची मानण्याचा काळ आता विज्ञान-ज्ञान युगाने मागे टाकायला हवा. मूर्तीच्या उंचीपेक्षा भक्तीची खोली कशी वाढेल, याचा विचार केला तर बुद्धीगणेश प्रसन्न होईल. आपण बाहेरील कुणाच नातेवाइकांकडे जाऊ शकत नाही, नि तेही आपल्याकडे येऊ शकत नाहीत. अशावेळी आरत्यांचा वा महाआरत्यांचा जल्लोष कदाचित होणार नाही; पण त्या वेळी ध्यानधारणा, आत्मचिंतन, ग्रंथपठण याला लागणारी शांतता मात्र लाभू शकेल. मनात विराजमान असणाºया निराकार बुद्धीगणेशाला याच प्रार्थनेचा धूप व दीप अधिक आवडतो. एक वेगळी अनुभुती या वेळी आपण घेऊ शकू याची खात्री आहे. या कोरोनापर्वात गणेशोत्सवावरच ज्याचे पोट आहे अशा अनेक व्यावसायिकांचीही आपण आठवण ठेवायला हवी. हातावरच ज्यांचे पोट आहे, असे फुलवाले, फळ व्यापारी, पूजासाहित्य व्यापारी यांच्या मिळकतीवर अतोनात परिणाम झाला आहे. अशा वेळी शक्यतो आॅनलाइन वा फोन करून वस्तू मागवून घेतल्यास त्यांना मदत होऊ शकेल. अगदी संपूर्ण फूल नाही, पण पाकळी तरी आपण त्यांना देऊ शकतो. गणेशोत्सवाची निर्मितीच मुळी ‘अवघे धरू सुपंथ’ या सहकार्याच्या भावनेतून झाली आहे. या वर्षी आपला खर्च जसा खूप कमी होत आहे, तशी अनेकांची ‘जमा’च होत नाही, याचा विचारसुद्धा बाप्पाची पूजा आहे याची जाणीव असायला हवी.
सुरळीत काळात सर्वच कार्ये आपण उत्साहात करतो. मी असे मानतो की या वर्षी साºया जगाचीच बुद्धीगणेश सत्त्वपरीक्षा घेत आहे. ही प्रतिकुलता आपण कशी स्वीकारतो नि जगण्याची ऊर्जा कशी अखंड जागी ठेवतो याचीच ही परीक्षा घ्यायला गणपतीबाप्पा येत आहेत.
या वर्षी दरवर्षीसारखा वाजतगाजत ढोल-ताशांचा गजर ऐकू येणार नाही. की गुलालाच्या रंगात न्हाणारे लेजीम झंकारणार नाही. सारे कसे ‘तोंड बांधून’ अर्थात मास्कधिष्ठित असणार आहे. सारेच सण तसे मुके मुके चालले आहेत. यंदासारखी सारे कसे सामसूम असलेली कालाष्टमी मी कधीच अनुभवली नव्हती. ना गोविंदांचा नाच, ना दहीहंडीची चुरस. आपल्या सर्व गोविंदांनी वर्तमान स्वीकारला नि घरातच दहीकाला केला. आता गणेशोत्सवही आनंदोत्सवच आहे. परंतु याच समजुतीने आपण हे वर्ष जरा संयमाने हाताळले तर येणारा काळ निर्विघ्न असणार आहे. विघ्नहर्त्याची तीच इच्छा आहे.
श्री गणेश ही विद्येची, बुद्धीची व सकलकलांची देवता आहे. खरेतर, बाप्पालाही त्या ढोल-ताशाची, आपल्या भेटीची ओढ आहे. त्यालाही आपल्या गजरावाचून करमणार थोडेच आहे? म्हणून त्याला प्रार्थना करून सांगू या, ‘पुढील वर्षी सारे जग निरोगी राहो. आम्ही अधिक चैतन्याने भेटायला येऊ!’ या वेळची प्रार्थना फक्त एकट्या आपल्या कुटुंबासाठीच नाही, विश्व कुटुुंबासाठी आहे. बुद्धीगणेशाला सांगू या, ‘निर्विघ्नम् कुरूमें देव् सकल कार्येषु सर्वदा!’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक
आणिं गीतकार आहेत.)
>बुद्धीगणेशाचे भक्तगणांना असलेले आवाहन बुद्धीनेच जाणणे व त्याला भक्ती भावनेची जोड देणे हे या वर्षीच्या गणेशोत्सवाचे रूप असणार आहे. त्या दृष्टीने या वर्षीचा बुद्धीगणेश सामाजिक प्रगल्भगतेचा वस्तुपाठ ठरायला हवा.