मुंबई - राज्यात कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता यावर्षी गणेशोत्सव विशेषतः. सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा यासाठी भूमिका शासनाने घेतली असली तरी मुर्तीची उंची व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतचे नियम अद्याप स्पष्ट न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. तयारीला लागणारा वेळ पाहता विलंब न करता शासनाने वेळीच नियमावली जाहीर करावी, अशी विनंती करीत भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
कोरोनामुळे यावेळी सर्वच सण अडचणीत आले असून आता महाराष्ट्रातील उत्सव गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. याबाबत आपण संबंधित यंत्रणा आणि दोन्ही समिती तसेच काही मंडळे यांच्या दोन वेगवेगळ्या बैठका नुकत्याच शासनाकडून घेतल्या गेल्या. त्यानंतर तातडीने गणेशोत्सवाबाबतचे नियम नियमावली जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे लेखी निर्देश शासनाने जारी केलेले नाहीत. परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जे संभ्रमाचे वातावरण झाले आहे, तसेच वातावरण गणेशोत्सवाबत निर्माण होऊ नये म्हणून वेळीच शासनाने सुस्पष्ट शासन निर्णय गणेशोत्सवाबाबत जाहीर करावा ही मागणी आशिष शेलारांनी केली आहे.
उपस्थितीत केलेले प्रश्न
- मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या बैठकीला गणेशोत्सव समन्वय समिती आणि महाराष्ट्र गणेशोत्सव समन्वय महासंघाला बोलावण्यात आले मात्र दुसऱ्या बैठकीत त्यांना का वगळण्यात आले?
- दोन्ही समित्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेश उत्सव मंडाळाच्या गणेशाची मुर्ती तीन फुट असावी अशी सूचना प्रशासनाकडून मांडली त्यावर दोन्ही समित्यांनी सहमती दर्शवली तर एक दोन मंडळांचा आक्षेप होता म्हणून पुढील बैठकीला या समित्यांच वगळण्यात आले का?
- प्रशासनाच्या सूचनेनुसार तीन फुट मुर्तीची उंची असावी यावर बहुतांश मंडळे राजी होत असतानाच आता यापेक्षा काही वेगळा निर्णय शासन घेणार की काय? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
- मुर्तीच्या उंचीबाबत स्पष्टता नसल्याने कारखान्यांचा खोळंबा झाला असून त्याबाबत शासन कधी स्पष्ट सूचाना जाहीर करणार?
- गर्दी टाळून बाप्पांचे दर्शन कसे उपलब्ध करुन देणार? प्रसादाचे वाटप करणार का?
- या काळत सोशल डिस्टंसिंगचे नियम कसे पाळले जाणार? कोणत्या स्वरुपात कार्यक्रम असावेत?
- आगमन, आरती आणि विसर्जन सोहळा कसा असेल?
- गणेशोत्सव मंडळांना परवानग्या घेताना दरवर्षी पेक्षा यावेळी काही वेगळ्या अटींची पुर्तता करावी लागणार का? तसेच ऑनलाइन परवानग्या उपलब्ध करून देणार का?
- मुंबई प्रमाणे कोकणात मोठ्याप्रमाणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो व त्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि परिसरातून चाकरमानी कोकणात जातात. यावेळी त्यांना कोकणात जाऊ देणार की नाही?