मुंबई - मराठा आरक्षणावरून(Maratha Reservation) राज्यसभेचे छत्रपती खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुपारी संभाजीराजे(MP SambhajiRaje Bhosale) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेणार आहेत. या भेटीनंतर संभाजीराजे आपली भूमिका मांडणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपही आपलं समर्थन दाखवत आहे. मात्र, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपाची भूमिका वेगळीच असल्याचं म्हटलंय.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाला भाजपाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच, भाजप नेते पक्षाचा झेंडा न घेता आंदोलनातील लढ्यात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खासदार संभाजीराजे आणि भाजपातील काही नेत्यांमध्ये सध्या तात्विक वाद दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजच संभाजीराजेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. मात्र, मराठा आरक्षणावरुन भाजपाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपाच्या विदर्भातील नेत्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, भाजपाचे हे नेते मराठा आरक्षणविरोधातील संघटनेचे संस्थापक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ''मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे आहेत. ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे?, असा प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे. तसेच भाजपाने याचे उत्तर द्यावे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष्य केलंय. भाजपाची मराठा समाजाशी ही गद्दारी नाही का?, असा सवालही सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे.
संभाजीराजेंवर भाजपा नेत्यांची टीका
मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांची सक्रीयता पाहता आता भाजपा नेते थेट त्यांच्याविरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil), राणे पिता पुत्र यांचा समावेश आहे. संभाजीराजे यांनी शरद पवार, राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नारायण राणेंनी त्यांना टोला लगावला आहे. नारायण राणे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरतायेत ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत. ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्याबाबत असं बोलणं चुकीचं आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजपानं दिलं. ज्यांच्या दारी फिरतायेत त्यांनी काय केलं? शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं? असा सवालही नारायण राणेंनी(Narayan Rane) उपस्थित केला.