'एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?'; शरद पवारांनी गृहखात्याला झापलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:37 AM2022-06-22T11:37:33+5:302022-06-22T11:46:55+5:30
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत सिल्वर ओकवर बैठक झाली.
मुंबई- राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसाममध्ये दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा केला. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित करत गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे व पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत. ही संख्या ४० असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. तसेच गटनेते पदाचा दावा करण्यासाठी शिंदे गोव्याला जाण्याची शक्यता होती. गेल्या अर्ध्या तासापासून या आमदारांची बैठक सुरु आहे. या बैठकीत गटनेता ठरविला जाणार आहे. तसेच त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे स्वत: राज्यपालांना भेटण्यास जाण्याची शक्यता आहे. याचवेळी भाजपाचे आमदारही संख्याबळ दाखवून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- राज्यमंत्री बच्चू कडू
आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे, असं बच्चू कडू म्हणाले.