पंपिंग स्टेशनचे काम किती पूर्ण झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:27 AM2018-08-07T02:27:06+5:302018-08-07T02:27:08+5:30
उपनगरात तीन ठिकाणी लावण्यात येणाऱ्या स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशनचे काम किती पूर्ण झाले, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई महापालिकेला दिले.
मुंबई : उपनगरात तीन ठिकाणी लावण्यात येणाऱ्या स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशनचे काम किती पूर्ण झाले, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई महापालिकेला दिले.
२६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या महाप्रलयानंतर महापालिकेने बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर ड्रेन (ब्रिमस्टोवॅड) प्रोजेक्ट हाती घेतला. याअंतर्गत शहरात आठ पंपिंग स्टेशन बांधण्यात येणार होती. त्यापैकी पाच पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत, तर तीन पंपिंग स्टेशन बाकी आहेत.
मुंबईची पावसाळ्यात ‘तुंबापुरी’ होत असल्याने सामान्यांचे हाल कमी व्हावेत, यासाठी सरकारला व महापालिकेला उपाययोजना आखण्याचे निर्देश द्यावेत व मुंबई उपनगरात आणखी एक डॉप्लर बसविण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.
सांताक्रुझ येथील गझदरबंध, अंधेरी येथील मोगरा आणि माहूल येथील तीन पंपिंग स्टेशन अद्याप उभारली नसल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील सी.के. नायडू यांनी न्यायालयाला दिली.
‘या तिन्ही ठिकाणी स्टॉर्म वॉटर पंम्पिग स्टेशनचे काम किती पूर्ण झाले आहे, याची माहिती देण्याचे निर्देश महापालिकेला देत आहोत,’ असे न्यायालयाने म्हटले.