Join us

नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?

By अतुल कुलकर्णी | Published: May 06, 2024 6:26 AM

राहुल गांधींची भेट झाली, आज रमेश चेन्निथला यांच्यासोबत पत्रकार परिषद

अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चार वेळा आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मोहम्मद नसीम खान यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. रविवारी त्यांनी रायगडमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाहीर सभांमध्ये सहभाग घेतला. तर, सोमवारी ते महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईत काँग्रेसने दोन जागी उमेदवार उभे केले आहेत. 

नसीम खान मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. मात्र, त्या जागी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या खान यांनी प्रचारातून अंग काढून घेतले होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, खा. चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, अमरजित मनहास या नेत्यांना गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना व्यक्तिगत निमंत्रणही दिले नाही. त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलो नाही, अशी तक्रार या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींपुढे केली.

माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी आपली नाराजी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही अनेक वर्षे काँग्रेसचे काम करत आहोत. आमचीही थोडीफार ओळख आहे. उमेदवाराने सगळ्यांना मानसन्मान दिला पाहिजे. त्यांनी आम्हाला एक फोन करून बोलावले असते तरी आम्ही गेलो असतो. उमेदवारी कधी भरणार हेच माहीत नव्हते, तर जाणार कसे? मात्र आता वाद करण्याची ही वेळ नाही. आम्हाला मुंबईतून काँग्रेस विजयी करायची आहे. कोण उमेदवार आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. येत्या काळात सगळी मुंबई आमचे काम बघेल असेही भाई जगताप यांचे म्हणणे होते.

नसीम खान यांना उमेदवारी दिली तर हिंदू-मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण होईल आणि त्याचा परिणाम मुंबईतल्या सगळ्या जागांवर होईल. भाजपला यातून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याची आयती संधी मिळेल, असा खोटा रिपोर्ट दिल्लीत पक्षश्रेष्ठींना पाठवला गेल्याची माहिती आहे. त्यामुळेच नसीम खान यांचे तिकीट आयत्यावेळी कापले गेले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या नसीम खान यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे प्रचार समितीचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर पुणे येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेच्या वेळी चेन्निथला यांनी नसीम खान आणि राहुल गांधी यांची भेट घडवून आणली. त्याआधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नसीम खान यांच्याशी संपर्क साधून त्यांना राज्यसभेसह अनेक मार्ग उपलब्ध आहेत. हा निर्णय म्हणजे अंतिम नाही, असेही सांगितले. मुस्लीम समाजातूनही नसीम खान यांना वेगळा विचार करण्यावर तीव्र विरोध होता. या सगळ्याचा परिणाम नसीम खान यांची नाराजी दूर होण्यात झाला. त्यानंतर त्यांची काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदावर नेमणूक करण्यात आली.

राहुल गांधी ज्या भावनेतून ही लढाई लढत आहेत त्याची आम्ही कदर करतो. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरत आहोत. माझ्या भावना मी त्यांना सांगितल्या. मुळात मी तिकीटही मागितले नव्हते. मात्र, केंद्रीय नेत्यांनी मी उभे राहणे कसे आवश्यक आहे हे सांगितले. त्यामुळे मी तयारी केली. आयत्यावेळी मला तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळेच मी नाराज होतो. पण, आता तो विषय संपला आहे. उद्धव ठाकरे यांनीही माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. संपूर्ण मुस्लीम समाज आणि उत्तर भारतीय आपल्या पाठीशी आहेत. या निवडणुकीत सगळे एक दिलाने काँग्रेससोबत राहतील, हा विश्वास आपण राहुल गांधी यांना पुण्याच्या भेटीत दिला आहे.     - नसीम खान, कार्याध्यक्ष, प्रदेश काँग्रेस

टॅग्स :काँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४