Join us

प्रत्यक्ष सरावाशिवाय प्रात्यक्षिक होणार कसे? प्रात्यक्षिक, मूल्यमापन मार्गदर्शनाअभावी विद्यार्थी चिंतातुर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 9:33 AM

तोंडी परीक्षा कशी आणि केव्हा होईल, असे प्रश्न विद्यार्थी करत आहेत.

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वर्षभर शाळा बंद होत्या, अजूनही संसर्गाचे सावट असताना आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा सराव झालेला नाही; पण त्याची मूल्यमापन पद्धती कशी असणार याबाबत काहीच सांगण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. लेखी परीक्षांना अवघे दोन महिने शिल्लक असताना कोविड प्रतिबंधात्मक नियम आणि खबरदारी घेऊन प्रात्यक्षिकांचे नियोजन, व्यवस्थापन आणि मूल्यमापन ही प्रक्रिया अवघड होणार असल्याने प्रात्यक्षिक परीक्षा, मूल्यमापन याबाबतची सुधारित नियमावली जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत शिक्षक, शाळा व्यवस्थापन यांच्याकडूनही होत आहे.

दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा या २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान, तर बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी / अंतर्गत परीक्षा या १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान पार पडतील, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. मात्र यंदा प्रात्यक्षिकांबाबत काही मार्गदर्शक सूचना, तसेच तोंडी परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात काही बदल असणार का, असे अनेक प्रश्न पालक आणि विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. 

गेल्या काही दिवसांत प्रात्यक्षिकांचा सराव न करता आल्याने प्रात्यक्षिक परीक्षा कशी द्यावी, याबाबत विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे, अनेकांचे अभ्यासक्रम अद्यापही पूर्ण नसल्याने गणित आणि विज्ञान विषयात विद्यार्थी मागे राहणार असल्याची भीती विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे किमान प्रात्यक्षिकांत गुण मिळवून नुकसान भरून काढता येईल असे मत पालक, विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही.

परीक्षा कशी घेणार? 

विज्ञान आणि गणित विषयाची लेखी परीक्षा ८० गुण व प्रात्यक्षिक परीक्षा २० गुण असे मूल्यमापन केले जाते. अनेक विद्यार्थी अजूनही ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यांची तोंडी परीक्षा कशी आणि केव्हा होईल, असे प्रश्न विद्यार्थी करत आहेत.

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचा सराव नाही ही गोष्ट खरी असली तरी त्याबाबत मंडळाकडून काही निश्चित उपाययोजना असतील. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू ठेवावी आणि मंडळाने लवकर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे. - महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महासंघ 

टॅग्स :शिक्षणपरीक्षा