मुंबईः जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. आतापर्यंत या रोगामुळे जगभरात 5 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक देशातील नागरिकांना याची लागण झाली आहे. चीनपाठोपाठ इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. पण भारतातली कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली असून, 134वर गेली आहे. तर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं आतापर्यंत देशभरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मुंबईतही कोरोना व्हायरसनं एकाला जीव गमवावा लागला आहे. दुबईवरून आलेल्या या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर भीतीचं वातावरण पसरलं आहे. दुबईचा प्रवास करून हा रुग्ण 6 मार्चला मुंबईत दाखल झाला होता. त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यानं स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतले. काही दिवस उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले. दरम्यान ते पुन्हा एकदा दुबईला कामानिमित्त गेले होते. पुन्हा भारतात परतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. प्रकृती अस्वास्थ्यापायी त्यांना 8 मार्चला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 12 मार्चला त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. 12 मार्चपासून या रुग्णावर कस्तुरबामध्ये उपचार सुरू होते. 13 मार्चला त्याच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली. पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यावरही कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. कस्तुरबा गांधी रुग्णालयात सध्या 9 रुग्ण असून, त्यातील एकाचा आता मृत्यू झाला आहे.
CoronaVirus : महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
राज्यात सध्या कोरोनाचे 39 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवड आणि पुणे भागात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 9 जणांना कोरोनाची बाधा झाली असून पुण्यातल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. राजधानी मुंबईत 6, तर उपराजधानी नागपुरात 4 रुग्ण आढळून आलेत. याशिवाय यवतमाळ, कल्याणमध्ये कोरोनाचे प्रत्येकी 3, नवी मुंबईत 2, तर रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आलीय. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलंय.
Corona Virus: कोरोनाच्या धास्तीनं मंत्रालयासह राज्यातील शासकीय कार्यालय बंद ठेवणार?