Join us

नियमावलीच बनली नसताना कृषी कायद्यांचा लाभ कसा झाला? डॉ. रत्नाकर महाजन यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 6:32 AM

तीन कृषी कायद्यांची अजून नियमावलीच तयार नाही, त्या कायद्यांमुळे देशातील करोडो गरीब-मध्यम शेतकऱ्यांचा फायदा झाला, असा निष्कर्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कशावरून काढला

मुंबई : तीन कृषी कायद्यांची अजून नियमावलीच तयार नाही, त्या कायद्यांमुळे देशातील करोडो गरीब-मध्यम शेतकऱ्यांचा फायदा झाला, असा निष्कर्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कशावरून काढला, असा सवाल करत त्यांचे हे विधान धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी दिली आहे.डॉ. महाजन पुढे म्हणाले, संसदेच्या संयुक्त बैठकीत बोलताना राष्ट्रपतींनी सर्व संकेत व प्रथा बाजूला ठेवून केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे देशातील कोट्यवधी गरीब व मध्यम शेतकऱ्यांना फायदा झाला, असे बेधडक विधान केले आहे.    वस्तुस्थिती अशी आहे की, हे कायदे संसदेत संमत झाले असले तरी उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या अंमलबजाणीसाठी आवश्यक नियमावली (Rules and regulations) अजून तयार नाही. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहेत आणि केंद्र सरकार त्यात आवश्यक त्या सुधारणा, एवढेच नव्हे तर त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यासदेखील तयार आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधी गरीब व मध्यम शेतकऱ्यांना या कायद्यांमुळे फायदा झाला, असे राष्ट्रपती महोदय कशाच्या आधारे म्हणत आहेत? की सरकारने लिहून दिले ते जसेच्या तसे वाचले, असेही त्यांनी विचारले.

टॅग्स :शेतकरीशेती