मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राऊतांवर आरोपांचे वार केले आहेत. मागील पत्रकार परिषदेत राऊतांनी मोहित कंबोज यांचं नाव घेत थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले होते. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांना(Devendra Fadnavis) बुडवणार असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यानंतर कंबोज यांनीही संजय राऊतांवर पलटवार केला होता.
आज पुन्हा शिवसेना नेते संजय राऊत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कुणाला टार्गेट करतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तत्पूर्वी मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी ट्विटरवरून संजय राऊतांना डिवचलं आहे. कंबोज म्हणाले की, संजय राऊत तुमचे आणि प्रविण राऊत यांचा संबंध काय? प्रविण राऊतांनी जी बेनामी संपत्ती जमवली ती कुठून आली? मागच्या पत्रकार परिषदेत तुम्ही जे जे आरोप लावलेत, ईडीमध्ये जाणार, सीबीआयकडे जाणार त्याचं काय झालं? मोठमोठे आकडेवारी दिली ती सलीम-जावेदची स्टोरी बंद केला. स्वत:वर टांगती तलवार असताना दुसऱ्यांवर आरोप करून दिशाभूल करण्याचं काम बंद करा असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच वसई-विरारपासून कुलाबापर्यंत बेनामी संपत्ती कशी जमवली. त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यावं. यूपीपासून गोव्यापर्यंत शिवसेनेच्या किती उमेदवारांचे डिपॉझिट वाचतं हे तुम्हाला १० मार्चला कळणार आहे. त्यामुळे यावर संजय राऊतांनी बोलावं असा टोला मोहित कंबोज यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना(Shivsena Sanjay Raut) लगावला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संध्याकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. त्याआधी सकाळी राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणेचा भ्रष्टाचार आज मी बाहेर काढणार आहे. भ्रष्टाचारी नेत्यांची पोलखोल करणार त्याचसोबत अनेक नेत्यांचे मुखवटे बाहेर आणणार आहे. शिवसेना भवनात काय होईल ते तुम्हाला कळेल. तपास यंत्रणा भ्रष्ट आहेत. ईडीचा भ्रष्ट कारभार समोर आणणार असा इशारा त्यांनी दिला आहे. याआधी राऊतांनी १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या निशाण्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या होते. तसेच, पत्रकार परिषदेनंतर जेव्हा-जेव्हा संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या-त्या वेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.