Join us

बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:14 AM

२००३ मध्ये विकासक विनय मंदानी आणि कल्पना शहा यांच्याशी सिद्दिकी यांनी भागीदारीत व्हर्टिकल डेव्हलपर्स या नावाने कंपनी सुरू केली होती. मात्र, एकाच वर्षात त्यांनी स्वतःच्या पत्नीशी भागीदारी करत झीअर्स डेव्हलपर्स नावाने एक गृहनिर्माण कंपनी सुरू केली.

मुंबई : बाबा सिद्दिकी हे राजकीय नेते म्हणून जेवढे लोकप्रिय होते तेवढीच मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्येही त्यांच्या नावाची चर्चा होती. विशेषतः वांद्र्यातील पाली हिल आणि खार परिसरात त्यांनी अनेक आलिशान गृहनिर्माण प्रकल्प उभारले. त्याचबरोबर वांद्रे परिसरातील दोन प्रमुख झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी लढा सुरू केला होता. त्यांच्या हत्येमागे एसआरए प्रकल्पातील वाद कारणीभूत आहे का, याचाही आता पोलिस तपास करीत आहेत.

असा सुरू झाला होता प्रवास- २००३ मध्ये विकासक विनय मंदानी आणि कल्पना शहा यांच्याशी सिद्दिकी यांनी भागीदारीत व्हर्टिकल डेव्हलपर्स या नावाने कंपनी सुरू केली होती. मात्र, एकाच वर्षात त्यांनी स्वतःच्या पत्नीशी भागीदारी करत झीअर्स डेव्हलपर्स नावाने एक गृहनिर्माण कंपनी सुरू केली.

- झीअर्स कंपनीच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांत त्यांनी वांद्र्यात विशेषतः पाली हिलसारख्या आलिशान परिसरात जवळपास ४० गृहनिर्माण प्रकल्प साकारले. पाली हिल परिसरात अनेक बॉलिवूड कलाकार वास्तव्याला आहेत. त्यांच्या सर्कलमध्ये बाबा सिद्दिकी चांगलेच लोकप्रिय होते. 

कंपनीचा दबदबाकाही बॉलिवूड कलाकार राहत असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचे कामही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम केल्यानंतर त्यांच्या कंपनीचा परिसरात चांगलाच दबदबा आहे. याच परिसरात आजही अनेक इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये त्यांचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दोन झोपु प्रकल्पांना केला होता विरोध    - वांद्रा येथील सध्या संत ज्ञानेश्वरनगर आणि बीकेसीमधील भारतनगर झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प चर्चेत आहेत. या प्रकल्पाला त्यांचा विरोध नव्हता; मात्र प्रकल्पातील लोकांना विश्वासात न घेतल्याचा तसेच या प्रकरणात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी विरोध केला होता. - संत ज्ञानेश्वरनगर प्रकल्प साकारला जाण्यासाठी उद्धवसेना नेते अनिल परब यांनी पुढाकार घेतला आहे. लार्सन अँड टुब्रो आणि वेलोर इस्टेट (आधीची डीबी रिॲलिटी, २ जी प्रकरणातील अडकलेल्या शाहिद बलवा यांची कंपनी) या कंपन्या हा प्रकल्प साकारण्याच्या तयारीत आहे. या सुमारे १० एकर जागेचा विकास ते करणार आहेत. 

- येथील साडेपाच हजार कुटुंबीयांचे पुनर्वसन केल्यानंतर तेथे आलिशान घरे, पंचतारांकित हॉटेल, कार्यालयीन इमारती तेथे उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पात अंदाजे २० हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होणार आहे. या प्रकल्पांचा विकास खासगी विकासकांमार्फत करण्याऐवजी म्हाडाच्यामार्फत करावा, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीदेखील केली आहे. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीगुन्हेगारी