Join us

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचा खर्च वाढला कसा? - चौकशीच्या मागणीसाठी भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:06 AM

चौकशीच्या मागणीसाठी भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनोरा आमदार निवास उभारणीचे ६०० कोटींचे कंत्राट रद्द ...

चौकशीच्या मागणीसाठी भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मनोरा आमदार निवास उभारणीचे ६०० कोटींचे कंत्राट रद्द करून ते ९०० कोटींवर नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. दोन वर्षांतच ६६ टक्क्यांनी खर्च कसा वाढला, असा प्रश्न करतानाच मुख्यमंत्र्यांनी हे कंत्राट तत्काळ रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. अन्यथा, मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

भाजप सरकारच्या काळात मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशनसोबत ६०० कोटींचा करार करण्यात आला; परंतु महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच तो करार रद्द केला. नवीन कंत्राटात केवळ विद्युतीकरणाच्या कामाकरिता तब्बल २५० कोटींचा खर्च दाखविण्यात आला. या कामाच्या वास्तुविशारदांनी वाढीव ३०० कोटी रुपयांचा खर्च हा इमारतीच्या फिनिशिंगवर होणार असल्याचे सांगितले आहे. ६०० कोटींच्या कामावर ३०० कोटींची फिनिशिंग केली जाणार असल्याचे सांगणे म्हणजे एकप्रकारचा घोटाळा आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

देशाच्या राजधानीतील सेंट्रल विस्टा इमारतीच्या बांधकामावरून टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सरकारचा कंत्राटनामा व वायफळ खर्च दिसत नाही काय? महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करण्यासाठी पैसे नसताना एवढ्या वाढीव दराने काढण्यात आलेले कंत्राट मुख्यमंत्र्यांनी तत्काळ रद्द करावे, अन्यथा या विरोधात भाजप मोठे आंदोलन करेल, असा इशाराही भातखळकर यांनी दिला.

------------------