Join us

धारावी क्रीडा संकुलाचे खाजगी क्लब कसे झाले? काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 3:16 PM

Varsha Gaikwad : धारावीकरांच्या हक्काच्या क्रीडा संकुलाच्या खासगीकरणाची खेळी थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. 

Varsha Gaikwad (Marathi News) मुंबई : गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील युवा खेळाडूंच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी, त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी एकनाथ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धारावीत उभारलेल्या भारतरत्न राजीव गांधी सार्वजनिक जिल्हा क्रीडा संकुलाचे रूपांतर खाजगी क्लबमध्ये करण्याचा डाव भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाने रचला आहे. ज्या क्रीडा संकुलातून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले, तेथे आता दारुचा बार सुरु करण्याचा प्रयत्न होत आहे, तो खपवून घेतला जाणार नाही. धारावीकरांच्या हक्काच्या क्रीडा संकुलाच्या खासगीकरणाची खेळी थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. 

एकनाथ गायकवाड यांच्या पुढाकारातुन काँग्रेसने २०१३ मध्ये धारावीत जागतिक दर्जाचे भारतरत्न राजीव गांधी सार्वजनिक जिल्हा क्रीडा संकुल उभारून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील युवा खेळाडूंना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या तीन मजली इमारतीत इनडोअर गेम्स, व्यायामशाळा, बहुउद्देशीय सभागृह, २०० मीटरचा रनिंग ट्रॅक, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट, कब्बडी ग्राउंड, बॉक्सिंग रिंग, जलतरण तलाव सारख्या सर्व क्रीडा सुविधा आहेत. या क्रीडा संकुलातून राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत, जवळपास २००० ते २५०० खेळाडू याचा लाभ घेत होते. स्थानिकांचा प्रखर विरोध आणि राज्य क्रीडा विभागाचा विरोध असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने तो डावलून २०१९ साली हे क्रीडा संकुल देखभालीच्या नावाखाली आपल्या विकासक मित्राच्या घशात घातले, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.

क्रीडा संकुल खाजगी विकासकाच्या हाती गेल्यानंतर इथले दर सर्वसामान्यांच्या मुलांना परवडणारे राहिले नाहीत. जलतरण तलावाचे वर्षाचे शुल्क २८ हजार रुपये आहे, टेनिस, बास्केटबॉलसाठी तासाला १५०० रुपये, बॅडमिंटनसाठी तासाला २१०० रुपये मोजावे लागतात. गोरगरिब व सामान्य कुटुंबातील मुलांचे खेळाडू बनण्याचे स्वप्न उध्वस्त करण्याचे पाप भाजपाने केले आहे. गोरगरिबांच्या क्रीडा संकुलाचा खाजगी क्लब करुन हा प्रकार थांबलेला नाही. आता सत्ताधाऱ्यांच्या मदतीने इथे दारूचे अड्डे सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही, याविरोधात एकजुटीने लढू, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :वर्षा गायकवाडकाँग्रेस