दोषी फरारी झाला कसा?
By admin | Published: April 21, 2017 02:59 AM2017-04-21T02:59:11+5:302017-04-21T02:59:11+5:30
रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या बनावट चकमकीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला दोषी पॅरोलवर असताना फरारी झाला कसा?
मुंबई : रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या बनावट चकमकीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला दोषी पॅरोलवर असताना फरारी झाला कसा? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने पोलिसांना याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
शैलेंद्र पांडे फरारी झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने झोन १०चे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांना तपास करण्याचे निर्देश दिले. ‘पोलीसही पांडेशी मिळालेले आहेत, असे वाटते,’ असे न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने म्हटले.
लखनभय्या बनावट चकमक प्रकरणी जुलै २०१३मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने २१ जणांना दोषी ठरवले. त्यात १३ पोलिसांचा समावेश आहे.
रुग्णालयातून दोषी फरारी झाला कसा? अशी विचारणा करत खंडपीठाने याबाबत पोलिसांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. ‘तो हत्येप्रकरणातील दोषी असल्याने तुम्ही (पोलीस) रुग्णालयात एकतरी हवालदार त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करायला हवा होता. त्याला पकडण्यासाठी आतापर्यंत काय पावले उचलली आहेत? हेही आम्हाला सांगा,’ असे खंडपीठाने म्हटले.
तर खंडपीठाने पोलीस उपायुक्तांना यास जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला शोधा, असेही सांगितले. (प्रतिनिधी)