छोटा राजनने हत्या केल्यानंतरही पत्रकार जे. डे यांचे मिशन पूर्ण कसे झाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 04:17 PM2018-05-02T16:17:08+5:302018-05-02T16:17:08+5:30
पत्रकार जे. डे यांची हत्या करण्याच्या कटाचे सूत्रधार, मारेकरी, साथीदार साऱ्यांनाच शिक्षा झाली. माफिया डॉन छोटा राजनसह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यात आली. एकप्रकारे पत्रकार जे.डे यांचे मिशनच यशस्वी झाले. प्राण गमावल्यानंतरही!
११ जून २०११. पत्रकार जे. डे यांची छोटा राजन टोळीने हत्या केली. मोटरसायकलवरुन जाताना त्यांच्या पाठीत पाच गोळ्या घालण्यात आला. हादरवणाऱ्या स्टोरी दिल्यानंतरही हवेत न जाता जमिनीवरच राहणारे खूप कमी पत्रकार असतात. जे.डे त्या मोजक्यांपैकीच एक मानले जात असत. कुणालाही मदतीसाठी, माहिती देण्यासाठी सदैव तयार. मोकळेपणाने. अशा पत्रकाराला कुणी आणि का मारलं ? आता त्यांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे मागे वळून आढावा घेत राजनने या पत्रकार जे.डे यांना का मारलं, ते शोधण्याचा हा एक प्रयत्न.
जे. डे त्यांच्या वेगळ्या बातम्यांसाठीच ओळखले जात. आधी इंडियन एक्स्प्रेस, अल्पकाळ चॅनल ७ आणि त्यानंतर मिड्डेचे संपादक (इन्व्हेस्टिगेशन) म्हणून काम करताना त्यांनी ज्या बातम्या दिल्या त्या वेगळं काही तरी उघड करत केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारण्यांनाही हादरवणाऱ्या असत. तपास करुन मिळालेल्या माहितीच्या सत्येतेची पडताळणी झाल्यानंतर जे. डे बेधडक ती मांडत असत. त्यातून अनेकांना ते नकोसे वाटत असतील त्यापैकी एक म्हणजे छोटा राजन. माफिया डॉन छोटा राजन. माणूस जेवढा मोठा असतो तेवढाच तो आतून आपल्या स्थानासाठी, जीवनासाठी असुरक्षितही. राजनच्या बाबतीत तेच झालं असावं.
जे.डे यांनी गुन्हेगारी जगतावर खल्लास, झीरो डायल ही दोन पुस्तकेही लिहिली होती. हत्या झाली त्यावेळीही ते एका पुस्तकाच्या तयारीत होते. चिंदी - रॅग्स टू रिचेस या पुस्तकात त्यांनी छोटा राजनला चिंधी असं संबोधल्याचे त्या माफिया डॉनला कुणीतरी कळवले. दरम्यानच्या काळात जे.डेंचं राजनशी बोलणे झाले. त्यांनी राजनला लंडनमध्ये भेटण्यास सांगितले. पण राजनचा लंडनमधील हस्तकाने त्याला जे. डे छोटा शकीलच्या साथीदारांच्या संपर्कात असल्याची खबर दिली. खरंतर पत्रकार असल्याने जे.डे यांनी प्रत्येक बाजूच्या लोकांच्या संपर्कात असणे स्वाभाविकच होते. मात्र राजनने वेगळा ग्रह करुन घेतला. किंवा काहींनी जाणीवपूर्वक तसा करुन दिला. जे.डे आपल्याला संपवू पाहत आहे. त्यातच मुंबईतील आणखी काहींनी त्याचे कान भरले. त्यानंतर २२ मे रोजी राजनने आपला साथीदार सतीश कालियाला फोन केला. जे.डेचे कार्यालय आणि इतर सर्व माहिती कळवली. त्यानंतर सतीशने सातजणांची टोळी जमवली. अनिल वाघमोडे आणि इतरांना एकत्र केले. रिव्हॉल्व्हरची व्यवस्था केली. त्यांनी जे.डे राहायचे त्या पवई हिरानंदानी परिसराची पाहणी केली.
६ आणि ९ जून २०११ च्या पाहणीनंतर ११जूनला सतीश कालिया साथीदारांसह त्या परिसरात पोहचला. मोटरसायकल आणि क्लालिस गाडीने. सतीश कालिया मोटरसायकलवर होता. जे.डेचा काही वेळ पाठलाग करुन लगेच त्याने त्यांच्या पाठीत पाच गोळ्या मारल्या. अवघ्या काही मिनिटांचा खेळ. मारेकरी पसार झाले. जखमी जे.डे यांना जवळच्या हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर मुंबईत बातमी पसरली. रुग्णालयाबाहेर शेकडो पत्रकारांची गर्दी उसळली. दुसऱ्या दिवशी जे.डेंवर अंत्यसंस्कार झाले.
जे.डेंची हत्या मुंबईच्या पत्रकारिता जगताला हादरवणारी घटना होती. पत्रकारांमध्ये संताप उफाळला. पोलिसांच्या मनातही जे.डेंविषयी एक वेगळा आदर होता. अनेकांना आपुलकीही होती. पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा वेगानं कामाला लागली. हत्येच्या सोळाव्या दिवशी २७ जून २००१ला सतीश कालिया, अभिजीत शिंदे, अरुण डाके. सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, महेश आगावणे यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्या चौकशीनंतर आणखी तिघांना अटक करण्यात आली. विनोद असरानी, दीपक शिसौदिया आणि पॉलसन जोसेफ हे तिघेही राजनचेच साथीदार. या सर्व आरोपींविरोधात मकोका या विशेष कायद्याचा वापर कऱण्यात आला. दरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पत्रकार जिग्ना वोराला अटक करण्यात आली.
हत्येनंतर सहा महिन्यातच २०११च्या डिसेंबरमध्ये ३,०५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यावेळी राजनला अटक झालेली नसल्यानं पाहिजे आरोपी दाखवण्यात आलं होतं. २१ फेब्रुवारी २०१२ ला जिग्नाविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान विनोद असरानीचा आजारपणानं मृत्यू ओढलला. प्रकरणाची सुनावणी सुरु असतानाच २५ ऑक्टोबर २०१५ रोजी राजनला इंडोनेशियात अटक झाली. त्यानंतर ५ जानेवारी २०१६ रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. पुढील तपासानंतर ३१ ऑगस्ट २०१७ रोजी राजनविरोधातही आरोपपत्र दाखल झाले. तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने त्याचा जबाब नोंदवण्यात आला. अखेर दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर २ मे २०१८ रोजी निकाल जाहीर झाला. पत्रकार जिग्ना व्होरा आणि पॉल्सन जोसेफ यांची निर्दोष मुक्तता झाली. छोटा राजनसह अन्य आठ आरोपींना दोषी ठरवण्यात आलं.
एक माफिया डॉन एका पत्रकाराचा जीव घेतो. का तर म्हणे तो त्याला चिंधी म्हणाला. का तर त्याच्याविरोधात होता. अखेर कायद्याने त्या डॉनलाही दोषी ठरवलं. त्याला आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेप झाली. जे.डे गेले. मात्र पत्रकार म्हणून ते ज्या मिशनवर होते...ते यशस्वी झालं. जे.डे समाजातील काही गुन्हेगार चिंधींनी अब्जाधिश होताना वापरलेले गैरमार्ग उघड करुन त्यांना कायद्यानं अद्दल घडवण्याच्या मिशनवर होते. अखेर राजनला शिक्षा झाल्यानं त्यांचं ते मिशन काही प्रमाणात तरी पूर्ण झालं.