‘एनआयए’ने नोंदवला आक्षेप; सचिन वाझेची रवानगी न्यायालयीन कोठडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्फोटक कार प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले सचिन वाझे याला ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याच सुनावणीदरम्यान ‘एनआयए’ने वाझेच्या लीक झालेल्या पत्राबाबत आक्षेप नोंदवला.
वाझेने लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अशात शुक्रवारी वाझेच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करताना, एनआयएच्या वकिलांनी हे पत्र माध्यमांत लीक कसे झाले, असा सवाल केला. वाझे आमच्या कोठडीत होता. इतर तपास यंत्रणांना या पत्राची माहिती नव्हती. त्यामुळे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यावर न्यायाधीशांनी वाझेचे वकील आबाद पोंडा यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी आपल्याला याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. त्यावर असा प्रकार पुन्हा होता कामा नये, अशी ताकीद न्यायाधीशांनी दिल्याचे समजते.
न्यायालयाने वाझेला २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यावर वाझेच्या जिवाला धोका असून त्याला सुरक्षित सेल मिळावा, अशी मागणी त्याच्या वकिलाने केली. त्याबाबतच्या सूचना न्यायालयाने दिल्या. त्यानुसार वाझेची रवानगी नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
....................