Join us

एका न्यूज अँकरला ती माहिती मिळालीच कशी? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 2:03 PM

अर्णब गोस्वामी लीक चॅटप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात प्रश्न विचारताना केंद्रीय संरक्षण समितीने याची दखल घेण्याची मागणीही चव्हाण यांनी केलीय

ठळक मुद्देअर्णब गोस्वामी लीक चॅटप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात प्रश्न विचारताना केंद्रीय संरक्षण समितीने याची दखल घेण्याची मागणीही चव्हाण यांनी केलीय

मुंबई - लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधील माहितीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्अ‍ॅप चॅटमध्ये काही मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता या चॅटबाबच अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकची कुणकूण आधीच लागली होती. असा दावा लीक झालेल्या व्हॉट्स अ‍ॅप चॅटच्या आधारावरून करण्यात आला आहे. यावरुन अर्णब गोस्वामी आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला असून संरक्षण समितीने याची दखल घेण्याची मागणी केली आहे. 

अर्णब गोस्वामी लीक चॅटप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात प्रश्न विचारताना केंद्रीय संरक्षण समितीने याची दखल घेण्याची मागणीही चव्हाण यांनी केलीय. ''मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत  गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी.'', असे ट्विट चव्हाण यांनी केलंय. 

आता कोर्ट मार्शल होणार का - संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लीक झालेल्या व्हॉट्सअप चॅटवरुन देशाच्या सुरक्षेबद्दल प्रश्न विचारले आहेत. तसेच, याप्रकरणी संबंधित व्यक्तीचे कोर्ट मार्शल होणार का? असा सवालही त्यांनी केलाय. ''राष्ट्रीय सुरक्षा, लष्कराची गुपितं, महत्त्वाची माहिती अशा प्रकारे बाहेर येत असेल, तर तो राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहे. आपण जणू काही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहोत, या थाटात हे चॅट समोर आलंय. याप्रकरणी देशाचे संरक्षणमंत्री, देशाचे गृहमंत्री यांनी आपली भूमिका मांडायला हवी. तसेच, राज्यातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली, तर महाराष्ट्राच्या अन् देशाच्या ज्ञानामध्ये भर पडेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तसेच, देशाच्या अंतर्गत सुरक्षेला हा धोका आहे. जर सैन्यातील एखाद्या जवानाकडे महत्वाचा कागद जरी सापडला तरी त्याचे कोर्ट मार्शल होते. पण, येथे तर पुलवामा आणि बालाकोटबद्दल अगोदरच माहिती होती. यावरुन, राष्ट्रीय सुरक्षेला छेद असल्याचे समोर आलंय. त्यामुळे, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री काय करणार? संबंधित व्यक्तीचे कोर्ट मार्शल करणार का? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. 

दरम्यान, १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र हा हल्ला होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधीच काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती आपल्या चॅटमधून दिली होती. मिळत असलेल्या माहितीनुसार २३ फेब्रुवारीच्या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती पार्थो दासगुप्ता यांना दिली होती.

पार्थ दासगुप्ता अन् गोस्वामींचा संवाद

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय असा करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या संभाषणात सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे समोर आले आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार करण्यात आला. हाच विषय ट्रेडिंगवरही होता, अशी माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :अर्णब गोस्वामीपृथ्वीराज चव्हाणसंरक्षण विभागसंजय राऊत