Postal to EVM मतांमध्ये इतका ट्रेंड बदलला कसा?; वरूण सरदेसाईंनी आकडेवारीच मांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:54 PM2024-12-02T13:54:54+5:302024-12-02T13:55:56+5:30
प्रत्येक जागेवर मविआ उमेदवारांची पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमध्ये ५ ते १५ टक्क्यांची घट दिसते आणि महायुती उमेदवारांच्या मतांमध्ये ५ ते १५ टक्के मते वाढतात हे कशी..? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
मुंबई - विधानसभा निकालांबाबत अद्यापही लोकांमध्ये संभ्रम आहे. शेवटच्या २ तासांत वाढलेले मतदान संशयास्पद आहे. जे मतदान झालंय, तशाच VVPAT मतमोजणी व्हायला हवी. आम्ही आरोप करत नाही मात्र जो काही डेटा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून घेतला आहे त्यातून बऱ्याच शंका उपस्थित होतात. त्यावर निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहिजे. पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमधील ट्रेंड इतका बदलला कसा असा सवाल करत ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी आकडेवारी मांडली.
वरूण सरदेसाईंनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतलेल्या आकडेवारीवरून एक प्रेझेंटेशन आहे. देशाचे संरक्षण करणारे सैनिक, वयोवृद्ध लोक, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी हे पोस्टल मते देतात. त्यामुळे पोस्टल मते हे त्या त्या मतदारसंघातील लोकांचं प्रतिनिधित्व करतं. लोकसभेची आकडेवारी पाहिली तर पोस्टल मतांमध्ये मविआ ३१ जागांवर तर महायुती १६ जागांवर आघाडी होती, EVM मतांमध्येही हा ट्रेंड होता. लोकसभेला हे आकडे तंतोतंत जुळले पण विधानसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेट निकालात महाविकास आघाडी १४३ आणि महायुती १४० जागा आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहे. मात्र ईव्हीएम मतमोजणीचे निकाल बाहेर आले तेव्हा महाविकास आघाडी ४६, महायुती २३० जागा आणि इतर १२ जागांवर पोहचले. एवढी मोठी तफावत कशी होऊ शकते हा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
तसेच वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंना पोस्टल मतदान ८७४ तर ईव्हीएम मतदानात ६२४५० मते मिळाली. मिलिंद देवरा ५२२ पोस्टल मते, ५४००१ ईव्हीएम मते मिळालीत. पोस्टलमध्ये मविआ उमेदवार पुढे आहे, महायुतीचे मागे आहेत. हाच ट्रेंड वरळीसह इतर मतदारसंघात आहेत. वांद्रे पूर्व माझ्या मतदारसंघात पोस्टलमध्ये मला २४ टक्के मते जास्त आहेत तर ईव्हीएममध्ये आमच्या मतांमध्ये घट झाली. केवळ शिवसेनेसोबत नाही तर काँग्रेससोबतही तेच झाले. पोस्टल मतात नाना पटोले ५४ टक्के पुढे असतात, तर ईव्हीएमध्ये मतांमध्ये १२.७ टक्के घट होऊन ते ०.२ टक्के मतांनी जिंकून येतात. जयंत पाटील राष्ट्रवादीचे त्यांना ७० टक्के पोस्टल मते मिळतात मात्र ईव्हीएम मतमोजणीत त्यांच्या मतांमध्ये १८ टक्के घट होते. अक्कलकुवा मतदारसंघात मविआ उमेदवार ४५ टक्के पोस्टल मतांनी पुढे असतात मात्र ईव्हीएममध्ये १५ टक्के घट होते आणि महायुतीचे ईव्हीएम मतमोजणीत प्रत्येक ठिकाणी वाढ होते, हा ट्रेंड आहे. पोस्टल मतांमध्ये अनेक मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे असते आणि ईव्हीएम मतमोजणीत मागे जातो. बाळासाहेब थोरात पोस्टल मतांमध्ये ६९.३ टक्के पुढे असतात ते ईव्हीएममध्ये मागे पडतात आणि अचानक महायुतीच्या उमेदवाराच्या टक्केवारीत वाढ होते. तिवसा, परतूर, कल्याण पूर्व, घाटकोपर पूर्व याठिकाणीही हाच ट्रेंड आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पोस्टल मतांमध्ये ऋतुराज पाटील पुढे असतात आणि ईव्हीएम मतमोजणीत ते मागे पडतात. Postal टू EVM मतांमध्ये इतका फरकेचा ट्रेंड कसा होतो जे याआधी कधी घडले नाही असंही वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाचं काम निवडणूक घेणे आहे. आमच्या मनात शंका असेल तर त्याचे निरसन करण्याचं काम निवडणूक आयोगाचे आहे. लोकसभेला जो ट्रेंड होता, तो विधानसभेला इतका फरक कसा पडला. जर भारताचे सैनिक, वयोवृद्ध, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी पोस्टल बॅलेटवर मतदान करतात. ईव्हीएममध्ये जे काही घोळ आहेत ते वेगवेगळ्या नेत्यांनी मांडले आहेत. प्रत्येक जागेवर मविआ उमेदवारांची पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमध्ये ५ ते १५ टक्क्यांची घट दिसते आणि महायुती उमेदवारांच्या मतांमध्ये ५ ते १५ टक्के मते वाढतात हे कशी..? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.