Join us

भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण संकुलात पाणी शिरण्यामागची पालिका प्रशासनाने दिलेली कारणे भाजपने फेटाळली आहेत. हे पम्पिंग स्टेशन ५० वर्षांपासून ...

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण संकुलात पाणी शिरण्यामागची पालिका प्रशासनाने दिलेली कारणे भाजपने फेटाळली आहेत. हे पम्पिंग स्टेशन ५० वर्षांपासून अस्तित्वात असून, भूतकाळात कधीही असा प्रकार घडला नाही. संकुलात येणारे पाणी विहार तलावात नैसर्गिकरीत्या जाते, ते का गेले नाही, असा सवाल करीत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

मुसळधार पावसाचे पाणी रविवारी भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये शिरले. यामुळे तांत्रिक समस्या उद्भवल्याने येथील विद्युत पुरवठाही खंडित करावा लागला. याचा फटका मुंबईतील पाणीपुरवठ्याला बसला. या संकुलात शिरलेले पावसाचे पाणी युद्धपातळीवर उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता व दुरुस्ती करण्‍यात आली. त्यानंतर पंप टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरू करून रविवारी सायंकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

मात्र २६ जुलै २००५ रोजी यापेक्षा मोठी अतिवृष्टी झाली होती. पण, या संकुलात त्या वेळी पाणी शिरले नव्हते. ज्या दिवशी विहार तलाव ओसंडून वाहू लागला, त्याच दिवशी हा प्रकार घडला आहे. सर्वसाधारणपणे पम्पिंग स्टेशनच्या आत येणारे पाणी विहार तलावात नैसर्गिकरीत्या जाते, ते का गेले नाही? या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत द्यावे स्पष्टीकरण

विहार तलावात पम्पिंग स्टेशनमधील पाणी वाहून जाण्याच्या मार्गात काही अडथळा निर्माण झाला होता का? असेल तर त्याची कारणे काय आहेत? भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून यावर काय उपाय करता येईल याचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.